(दापोली)
तालुक्यातील मुरुड येथील साई रिसॉर्टच्या जागा प्रकरणी अटक करण्यात आलेले तत्कालीन मंडल अधिकारी सुधीर पारदुले यांची जामिनावर मुक्तता झाली आहे.
मुरुड येथे अनिल परब यांच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झालेले नसताना इमारत पूर्णत्वाचा भासवून मुरुड ग्रामपंचायतीची व पर्यायाने शासनाची फसवणूक केली. या प्रकरणी तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक तसेच मंडल अधिकारी यांच्याविरोधात गटविकास अधिकाऱ्यांनी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या अनुषंगाने पारदुलेंना अटक करण्यात आली होती.
पारदुलेंनी मुरुड येथील गट क्रमांक ४४६ या शेतजमिनीला बिनशेती परवानगी मिळण्यासाठी दिलेला चौकशी अहवाल वस्तूस्थितीला धरून नाही, हे ठिकाण सीआरझेडमध्ये असू नये, सीआरझेड तरतुदीचा भंग होत नाही, असा खोटा अहवाल दिला. ग्रामपंचायतचा रस्ता नसताना तो आहे असे खोटे सांगून दिशाभूल केली, असा अहवाल पोलिसांनी न्यायालयाला दिला होता. यामुळे पारदुलेंना अटक झाली होती. त्यांच्या अटकेमुळे तलाठी व मंडल अधिकारीवर्गात खळबळ माजली आहे.