(दापोली / प्रतिनिधी)
तालुक्यामधील आडे गुहागर आळी दापोली येथून मयुरी जाधव ही २४ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची घटना १५ जुलै रोजी दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमारास घडली.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयुरी जाधव ही भाऊ मेहुल याच्यासोबत दि. १५ जुलै रोजी दुपारी २.३० च्या सुमारास आडे येथून केळशी दापोली या बसने आंबवली येथे राहणारी त्यांची आत्या ममता भुवड यांच्या घरी जात असल्याचे सांगून निघाली होती. मेहुल जाधव हा सालदुरे या ठिकाणी कामानिमित्त खाली उतरला. मयुरी जाधव ही एसटी बसने पुढे निघून गेली. मयुरी आंबवली येथे उतरल्याचे एसटी कंडक्टर याने सांगितले.
मयुरी तिच्या आतेकडे गेली नसल्याचे समजल्यामुळे तिचा भाऊ मेहुलने आसूद या ठिकाणी राहणारी मावशी अश्विनी रेवाळे हिच्याकडे गेली आहे का याचा तपास केला. परंतु ती त्या ठिकाणी आढळून आली नाही. त्यानंतर मुंबई येथे राहणारे मामा अमित शिर्के यांच्याशी संपर्क करून मयुरी तिकडे आली का याची चौकशी केली. ती तेथेही गेली नसल्याचे आढळले. या प्रकरणी भाऊ मेहुल याने दापोली पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल केली असून अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मोहिते करीत आहेत.