( गुहागर )
दाढी करून येतो, असे सांगून घराबाहेर पडलेल्या प्रौढाचा मृतदेह आढळल्याची घटना गुहागर येथे घडली. ब्रह्मा पांडुरंग होळंब ( ४९ , रा . कीर्तनवाडी, गुहागर ) असे त्याचे नाव असून, दारूच्या नशेत त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रह्मा होळंब रविवारी ५ फेब्रुवारी रोजी दुपारी 2.30 वाजता दाढी करून येतो असे आईला सांगून घराबाहेर पडले होते. मात्र, दुसऱ्या दिवसापर्यंत ते घरी परत न आल्याने गुहागर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली.
पोलिसांसह नातेवाईकांकडून त्यांचा शोध सुरू होता. दरम्यान, त्यांचा शोध सुरू असताना मंगळवारी सकाळी घराजवळील भागात मृतदेह आढळला. याबाबतची माहिती मयताचा भाऊ विष्णू पांडुरंग होळंब यांनी गुहागर पोलिसांना दिली. पोलिसांनी स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. अधिक तपास पोलिस फौजदार आनंद पवार करत आहेत.