(रत्नागिरी / प्रतिनिधी)
देवरुख क्रांतीनगर येथे शारदा दत्तात्रय संसारे (80) या वृध्द महिलेचा मृत्यू झाल्याचे सोमवार 31 ऑक्टोबर रोजी उघडकीस आले. वृध्देच्या मुलाने म्हणजे दीपक दत्ताराम संसारे यांनी देवरुख पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. सोमवार 31 ऑक्टोबर रोजी जेव्हा मृतदेह सापडला. त्यावेळी वृध्देच्या अंगावर दागिने नव्हते. त्यामुळे हा घातपात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. अंगावरील दागिने नसल्यामुळे दागिन्यांसाठी खून करण्यात आल्याची चर्चा परिसरात रंगत होती.
दरम्यान येथील परिसरात मंगळवारी उलटसुलट चर्चाही रंगत होत्या. अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. शारदा यांचा दागिन्यांसाठी खून करण्यात आला असेल तर, चोरटे दागिने लुटून, मारुन पळून गेले असते. मात्र खून करुन वृध्देला टेरेसवर नेवून तेथील पाण्याच्या टाकीत टाकण्याएवढा वेळ त्यांनी कशाला घालवला असता?
सोमवारी सकाळी 9.30 वा. दीपक संसारे (मुलगा) हे कामावर गेले होते. दुपारी घरी आल्यानंतर पाहिले तर घराला बाहेरुन कुलुप होते. त्यांनी फोनाफोनी करुन आईचा शोध घेतला. मात्र ती कुठेच दिसून आली नाही. एवढ असेल तर मग चोरटयांनी वृध्देला मारुन नंतर घराला टाळे लावेपर्यंत, टेरेसवर नेवून टाकेपर्यंत सदनिकेतील एकाही व्यक्तीने पाहिले नाही का? किंवा वृध्देने प्रतिकार करताना आवाज तरी आला असेल ना? ही घटना घडली ती भरदिवसा घडली आहे. त्यामुळे भरदिवसा एका वृध्देला मारुन टेरेसवरील टाकीत नेवून टाकले जात असेल, तर सदनिकेतील कोणाही व्यक्तीने पाहिले नाही का? किंवा वृध्देच्या ओरडण्याचा आवाज सुध्दा आला नाही का? घराला बाहेरुन लॉक लावण्यात आलं असेल तर घरात लॉकची चावी कुठे ठेवलेली आहे हे चोरटयांना कसं ठाउक असेल? वृध्देला मारल्यानंतर एवढा मृतदेह एकटा व्यक्ती टेरेसवर नेऊ शकतो का आणि एवढया मोठया पाण्याच्या टाकीत टाकू शकतो? चोरटयांना कसं माहिती की, टेरेसवर पाण्याची टाकी आहे? असे अनेक प्रश्न परिसरात चर्चिले जात आहे. हा प्रकार कुणीतरी माहितगार व्यक्तीने केलेला असावा. त्याशिवाय एवढी इत्थंभूत माहिती चोरटयांना कशी असेल अशीही चर्चा परिसरात सुरु आहे.
नाणीज येथेही एका वृध्देवर सळीने वार करुन तिच्या अंगावरील दागिने चोरटयांनी पळवले. ती एकटीच असल्याची संधी साधली होती. या घटनेसारखीच देवरुखातील ही घटना आहे. मात्र नाणीज येथील वृध्देवर वार करुन चोरटे पळाले. आणि देवरुखच्या ठिकाणी चोरांनी वृध्देचा मृतदेह टेरेसवरील टाकीत नेवून टाकला. नाणीज येथील घटनेत चोरटे दागिने घेवून पसार झालेत दागिने चोरणे हाच चोरांचा उद्देश असेल तर वृध्देला मारुन टेरेसवर टाकीत मृतदेह टाकण्याएवढा वेळ चोर का घालवतील? शिवाय भरदिवसाची ही घटना आहे, असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. मात्र काहीही असले तरी पोलीस या घटनेचा तपास करतील आणि खून्याला ताब्यात घेतील असे बोलले जात आहे.
पोलिसांनी डॉगस्कॉड आणि ठसे तज्ज्ञांच्या सहाय्याने तपास सुरु केला आहे. त्यामुळे आता लवकरच या प्रकरणाचा छडा लागेल असा विश्वास पोलिसांना आहे.