(खेड)
सोन्याचे दागिने पॉलिश करून देतो, असे सांगून दोन भामट्यांनी एका वृद्धेचे तब्बल आठ तोळ्याचे दागिने घेऊन पसार झाले. हा खळबळजनक प्रकार खेड शहरानजीकच्या भरणे घडशीवाडी येथे सोमवारी दुपारी १२ वाजता घडला. या प्रकरणी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भरणे घडशीवाडी येथे सोमवारी, दि. ८ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास दोन भामटे एका घरात गेले. तेथे त्यांनी सर्वांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर ते शेजारी राहणाऱ्या शिवलकर नावाच्या एका वृद्ध महिलेच्या घरी गेले. या वृद्ध महिलेने आपले सोन्याचे दागिने त्यांच्याकडे पॉलिश करण्यासाठी दिले. हे दागिने पॉलिश करताना हे भामटे हातचलाखी करून तिचे सोन्याचे दागिने घेऊन पळून गेले.
या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक केंद्रे तपास करीत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत. या महिलेचा मुलगा सायंकाळी खेडमध्ये आल्यानंतर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक नितीन भोयर यांनी दिली.
गेल्या काही महिन्यांमध्ये अशा प्रकारचे गुन्हे खेड ते भरणे मार्गावर गुलमोहर पार्क तसेच डाकबंगला परिसर व महाड नाका परिसर या ठिकाणी घडलेले आहेत अशाच प्रकारे सोने पॉलिश करून देतो असे सांगत गुलमोहर पार्क येथेही दोन प्रकार घडले आहेत, तर महाड नाका या परिसरामध्ये एका महिलेचे व खेडमधील एका व्यावसायिकाचे सोन्याचे दागिने तोतया पोलिसांनी चोरले आहेत. या घटना लागोपाठ घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.