(मुंबई)
आयएस दहशतवादी मॉड्यूल प्रकरणाचा तपास करणाऱ्या एनआयएच्या चार्जशीटमध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत. एनआयएने सात आरोपींविरुद्ध हे आरोपपत्र दाखल केले आहे. मोहम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान, मोहम्मद युनूस मोहम्मद याकूब साकी, कादिर पठाण, सीमाब काझी, झुल्फिकार बडोदावाला, शामील नाचन आणि अकिफ नाचन अशी त्यांची नावे आहेत. एनआयएने सांगितले की, आरोपी मोहम्मद नावाच्या वॉन्टेड आरोपीच्या संपर्कात होते आणि त्यांचा दहशतवादी कट राबविण्यासाठी पुण्यातील दोपदेव घाट येथे कादिर पठाणच्या घरी बैठका घेत असत. या भेटीत आरोपींनी अनेकांना भरती करण्याची योजना आखली आणि त्यांची भरती कशी करायची यावरही चर्चा केली. भारतात मोठ्या दहशतवादी हल्ल्याची योजना आखत होते.
एनआयएने पुढे माहिती दिली की, आरोपी अकिफ नाचनने फेब्रुवारी 2022 मध्ये मध्य प्रदेशातील रतलाममध्ये आयईडी कसा बनवायचा याचे प्रशिक्षण घेतले होते. त्या प्रशिक्षण शिबिरात अनेक लोक उपस्थित होते आणि कोणतीही शंका येऊ नये म्हणून संपूर्ण प्रशिक्षण इम्रान नावाच्या व्यक्तीच्या पोल्ट्री फार्ममध्ये देण्यात आले. या प्रशिक्षण शिबिरात त्याने एक व्हिडिओही बनवला होता, जो एनआयएने जप्त केला आहे.
वेगवेगळ्या रसायनांचा वापर करून बॉम्ब कसा बनवायचा आणि तो बॉम्ब सक्रिय करण्यासाठी बल्ब कसा वापरायचा हे अकिफने तिथे शिकले. एनआयएने आरोपपत्रात असेही म्हटले आहे की, बॉम्ब बनवण्याच्या प्रशिक्षणादरम्यान आरोपींनी सल्फ्यूरिक अॅसिड, एसीटोन, हायड्रोजन पेरॉक्साइड कसे वापरायचे हे देखील शिकवले. ते वापरताना, तापमान 0-10 अंशांच्या दरम्यान ठेवावे आणि डिटोनेटरसाठी बल्ब किंवा मॅचस्टिक पावडरचा वापर करावा.
एनआयएने आरोपपत्रात म्हटले आहे की, बॉम्ब बनवण्याचे तंत्र किंवा रसायनांशी संबंधित संभाषण कोणालाही कळू नये, यासाठी आरोपींना कोड वर्ड रसायन देण्यात आले. सल्फ्यूरिक ऍसिडसाठी व्हिनेगर, एसीटोनसाठी गुलाब पाणी आणि हायड्रोजन पेरॉक्साइडसाठी शरबत कोड वापरला गेला. तपासादरम्यान एनआयएला आढळून आले की, आरोपी मोटारसायकलचा वापर करून महत्त्वाच्या भागात रेकी करत असत.