काल बुधवारी दसर्याच्या दिवशी मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. कुर्ला भागात एका तरुणीचा मृतदेह हात पाय बांधलेल्या अवस्थेत एका नाल्यात आढळला आहे. या तरुणीचा मृतदेह अर्धा सडलेल्या अवस्थेत होता. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
पोलिसांना स्थानिकांकडून या प्रकाराबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तरुण मुलीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रथमदर्शनी पाहता या मुलीचा खून करून तिचा मृतदेह फेकला असावा असा अंदाज व्यक्त होत आहे.
तरुणीच्या शरीरावर कुठल्याही जखमा नाहीत, परंतु तिच्या गळ्यावर काही खुणा दिसत आहेत. याचा अर्थ तरुणीचा गळा आवळून तिचा खून करण्यात आला असावा असे बोलले जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच सदर तरुणीची ओळख पटवण्याचे आव्हान पोलिसांकडे असून तिच्या खुन्याचाही शोध पोलिसांनी सुरू केला आहे. पोलीस या प्रकरणी कुठल्या तरुणीची बेपत्ता झाल्याची तक्रार झाली आहे का याचा तपास करत आहे. तसेच ज्या भागात महिलेचा मृतदेह आढळला त्या भागातील सीसीटीव्ही फुटेजही पोलीस तपासत आहेत.