[ मुंबई ]
शिंदे गटाकडून शिवसेनेचा दसरा मेळावा हायजॅक करण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा रंगत आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी मुंबई महापालिकेने अद्यापही परवानगी न दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, दसरा मेळाव्यासाठी परवानगी न देण्यामागे राजकीय दबाव असल्याचे सूचक वक्तव्य शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केले आहे.
विनायक राऊतांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते म्हणाले की, मुंबई महापालिकेकडून मेळाव्याला परवानगी मिळावी यासाठी शिवसेनेने अर्ज दाखल केला असताना महापालिकेने मात्र हात आखडता घेतला आहे. पारंपरिक दसरा मेळाव्यासंबंधी मुंबई महापालिकेकडे परवानगी मागणारे रीतसर पत्र देण्यात आले आहे. मुंबई महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनी आधी सकारात्मक भूमिका दाखवली. मात्र सध्या राजकारणाची हद्द पार होताना दिसत असल्याचे विनायक राऊत यावेळी म्हणाले.