(मुंबई)
काल दसऱ्यानिमित्त दोन्ही गटांचे झालेले मेळावे अभूतपूर्व गर्दीत संपन्न झाले. यावेळी दोन्ही गटाकडून गर्दी खेचण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात आले. कुणाच्या मेळाव्याला जास्त गर्दी होणार यावरून दोन्ही गटामध्ये जोरदार चढाओढ सुरू होती. गेले महिनाभर यासाठी नियोजन सुरू होते.
शिवसेना ठाकरे गटाचा मेळावा शिवाजी पार्क (शिवतीर्थ) वर आणि शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीत पार पडला. दोन्ही गटाकडून गर्दी खेचण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करण्यात आले. अखेरीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गर्दी जमवण्यात बाजी मारली आहे. बीकेसी मैदानावर सव्वा लाखाडून अधिक लोक आल्याची माहिती दिली जात आहे. तर शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला ६५ हजार शिवसैनिक आले होते अशी माहिती मिळत आहे.
शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यामुळे शिंदे गटाने आपला वेगळा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर भरवला होता. या मेळाव्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते बोलावण्यात आले होते. संपूर्ण राज्यातून १८०० बसेस, ३ हजार खासगी वाहने भरून लोक बीकेसीतील मेळाव्यासाठी आले होते.
एमएमआरडीएच्या बीकेसी मैदानाची क्षमती शिवाजी पार्कहून तीन ते चार पट मोठी आहे. दोन्ही मैदाने शिवसैनिकांकडून खचाखच भरली होती. त्यामुळे या मैदानावर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा संख्या जास्त असणार अशी शक्यता होती. यावेळी मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे यांच्या मेळाव्याला अंदाजे १ लाख २५ हजार कार्यकर्ते जमा झाले होते.