(मुंबई)
दसरा मेळाव्यासाठी दोन्ही गटांनी तयारी सुरू केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेना ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला परवानगी दिली. त्यानंतर ठाकरे गट शिवाजी पार्क तर शिंदे गट बीकेसी एमएमआरडीए मैदानावर सभा घेणार हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे दोन्ही मैदाने कार्यकर्त्यांनी तुडूंब भरवण्यासाठी दोन्ही गट तयारी करीत आहेत. कार्यकर्त्यांच्या या रेकॉर्ड ब्रेक गर्दीतूनच ठाकरे आणि शिंदे गट आपली ताकद दाखवत शक्ती प्रदर्शन करणार असल्याचे चित्र आहे.
वाजत-गाजत-गुलाल-उधळत या! पण शिस्तीत या! असे म्हणत मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या शिवसैनिकांना विचारांचे सोनं लुटण्यासाठी शिवसेनेचे परंपरा असलेल्या दसरा मेळाव्यासाठी निमंत्रित केले आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर शिवसेना ठाकरे गटात एक नवी ऊर्जा संचारली आहे. राज्यभरातून हजारोंच्या संख्येने शिवसैनिक शिवाजी पार्कवर दस-याच्या दिवशी जमा होणार आहेत. त्यामुळे शिवाजी पार्क मैदान कार्यकर्त्यांनी गच्च भरेल, अशा प्रकारची तजबीज आता शिवसेना ठाकरे गटाने केली आहे.
शिंदे गटाला जरी शिवाजी पार्क मैदान मिळालेले नसले तरी बीकेसी एमएमआरडीए मैदानावर दसरा मेळावा घेण्यास परवानगी मिळाली आहे. हे मैदानसुद्धा शिवाजी पार्क एवढेच मोठे आणि भव्य आहे. तर राज्यभरातून ५ लाख कार्यकर्ते जमतील, अशा प्रकारची तयारी शिंदे गटाकडून केली जात आहे. या निमित्ताने दोघांनाही शक्तिप्रदर्शनाची संधी आहे. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.