(मुंबई)
विजयादशमीच्या संध्याकाळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा दसरा मेळावा दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे. या दसरा मेळाव्याला आता अवघे काही तासच शिल्लक उरले आहेत. दसरा मेळाव्यानिमित्त मोठ्या प्रमाणावर राज्यभरातून शिवसैनिक शिवतीर्थावर जमा होणार आहेत. या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, म्हणून मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने पार्किंग व्यवस्था जाहीर केली आहे.
दादरच्या शिवतीर्थ येथील दसरा मेळाव्यास पश्चिम व उत्तर उपनगरातून बसमधून येणाऱ्या शिवसैनिकांसाठी सेनापती बापट मार्ग, दादर पश्चिम व कामगार मैदान परळ येथे व्यवस्था करण्यात आली आहे. तर कार पार्किंगसाठी इंडियाबुल्स फायनान्स सेंटर, इंडियाबुल्स फायनान्स सेंटर-१, कोहिनूर स्क्वेअर येथे व्यवस्था केली आहे.
त्याचबरोबर इतर जिल्ह्यातून येणाऱ्या शिवसैनिकांच्या बस पार्किंगसाठी पाच उद्यान माटुंगा, नाथालाल पारेख मार्ग, एडनवाला रोड, आर ए के रोड येथे पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने पार्किंगची ही व्यवस्था जाहीर केली आहे.
इतिहासात प्रथमच शिवसेनेच्या दोन गटांच्या स्वतंत्र सभा होणार असल्याने अभूतपूर्व गर्दी जमवण्यासाठी कोट्यवधींचा खर्च केला जात आहे.