(नवी दिल्ली)
पामतेलाचे भाव एका वर्षातील नीचांकी पातळीवर पोहोचले आहेत. जागतिक मंदीमुळे सोयाबीन, सीपीओ, पामोलिन आणि सूर्यफुलाच्या किमती जवळपास निम्म्याने खाली आल्या आहेत. यामुळे सणासुदीच्या काळात नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. या महिन्यापासून सणासुदीच्या काळात खाद्यतेलाच्या किमतीत मोठी घसरण होऊ शकते. आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या किमतीत घसरण झाली आहे. तर नवीन सोयाबीन पिकाची तुरळक आवक सुरू झाल्याने त्याचाही खाद्यतेलाचा भावावर परिणाम होऊ लागला आहे.
विदेशी बाजारातील मंदीचा परिणाम खाद्यतेलाच्या किमतीसह सर्वच वस्तूंच्या किमतीवर होत आहे. विदेशी बाजारात घसरण झाल्यानंतर स्थानिक बाजारात तेल आणि तेलबियांच्या किमती घसरल्या आहेत. सर्व तेल-तेलबियांच्या किमतीत मोठी घसरण होऊनही, तेल कंपन्यांची एमआरपी उच्च राहिली आहे. जवळपास चार महिन्यांपूर्वी २१०० डॉलर प्रति टन असणाऱ्या पामोलिनची किंमत घसरून ९५० डॉलर प्रति टन झाली आहे. मात्र किरकोळ विक्रेत्यांकडून पूर्वीचेच दर आकारले जात असल्याने या जागतिक घसरणीचा लाभ ग्राहकांना मिळत नसल्याचे दिसून येत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात पाम तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाल्यानंतर भारताने ऑगस्ट महिन्यात विक्रमी पाम तेलाची आयात केली आहे. जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्ट २०२२ मध्ये पाम तेलाच्या आयातीत ८७ टक्के वाढ झाली आहे, जी ११ महिन्यांतील सर्वाधिक आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात पाम तेलाची किंमत एका वर्षातील नीचांकी पातळीवर आली आहे.