( देवरुख / वार्ताहर )
दलित मित्र रमाकांत आर्ते यांच्या नावाने पहिला ‘श्रमभारती पुरस्कार’ इचलकरंजी येथील संजय रेंदाळकर यांना नुकताच राष्ट्रसेवादलाचे कार्यकर्ते अभिजीत हेगशेट्ये यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार एजीएफसी संघटनेच्या वतीने देण्यात आला.
शहरातील हॉटेल पार्वती पॅलेस मध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी एजीएफसी चे संस्थापक अध्यक्ष यासीन पटेल, अध्यक्ष गणेश कोळी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
पुरस्काराला उत्तर देताना संजय रेंदाळकर यांनी आपण राष्ट्रसेवा दलाच्या मुशीतून घडलो आणि याच दलाचे काम करणाऱ्या कार्यकर्त्याकडून आपल्याला पुरस्कार मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. साने गुरुजींच्या विचारांनी आपण प्रेरित आहोत. हेच विचार आजच्या तरुण पिढीने अंगीकारले पाहिजे असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमामध्ये श्री. रेंदाळकर यांनी लिहिलेल्या ‘विचारधन’ या पुस्तकाचे प्रकाशन देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अभिजीत हेगशेट्ये यांनी राष्ट्रसेवा दलाचे केलेले काम व दलित मित्र रमाकांत आर्ते यांचा जीवनपट उलघडला.
एजीएफसीचे अध्यक्ष गणेश कोळी यांनीही एजीएफसीच्या कार्याची महती नमूद केली. संस्थापक अध्यक्ष यासीन पटेल यांनीही संस्थेच्या वाटचालीबरोबरच पत्रकारांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी ही संघटना राष्ट्रभर काम करत असते. सामाजिक बांधिलकी जपून मित्र परिवाराला देखील जोडून संघटना काम करत असते. याचाच एक भाग म्हणून पुरस्कार वितरण हा उपक्रम हाती घेतल्याचे त्यांनी सांगून संजय रेंदाळकर यांना देण्यात आलेल्या पुरस्काराबद्दल योग्य व्यक्तीला पुरस्कार मिळाल्याचा आनंद व्यक्त केला.
कार्यक्रमाप्रसंगी बाळकृष्ण कासार, सत्यवान विचार, प्रकाश वणजू यांसह एजीएफसीचे पदाधिकारी, सभासद, पत्रकार बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युयुत्सू आर्ते यांनी करताना संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा मांडून स्व. रमाकांत आर्ते यांची कार्यप्रणाली सर्वांसमोर आणली. आभार मिहीर आर्ते यांनी मानले.
फोटो – संजय रेंदाळकर यांना दलित मित्र रमाकांत आर्ते यांच्या नावाने ‘श्रमभारती’ हा पुरस्कार प्रदान करताना अभिजीत हेगशेट्ये, यासीन पटेल, गणेश कोळी, युयुत्सू आर्ते व मान्यवर