(नवी दिल्ली)
वरिष्ठ आयपीएस अधिकारी दलजितसिंह चौधरी यांची सशस्त्र सीमा बलाच्या (एसएसबी) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आल्याचे कार्मिक विभागाने शुक्रवारी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. चौधरी हे १९९० च्या तुकडीतील उत्तरप्रदेश कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत.
सध्या ते केंद्रीय राखीव पोलिस दलाचे विशेष महासंचालक आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने ३० नोव्हेंबर २०२५ म्हणजे सेवानिवृत्तीच्या तारखेपर्यंत एसएसबीच्या महासंचालकपदी त्यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली असल्याचे आदेशात म्हटले आहे. भारताच्या नेपाळ आणि भूतान सीमेचे रक्षण एसएसबीकडून केले जाते. रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालकपदावर नियुक्ती झाल्यापासून हे पद रिक्त होते.