(नवी दिल्ली)
कोळसा खाणवाटप गैरव्यवहार प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा, त्यांचे पुत्र देवेंद्र दर्डा आणि उद्योगपती मनोजकुमार जयस्वाल यांना सुनावण्यात आलेल्या चार वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. छत्तीसगडमधील खाणवाटप प्रकरणी गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवत कनिष्ठ न्यायालयाने जुलैमध्ये विजय दर्डा आणि इतरांना चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. दर्डा यांनी या निकालाला आणि सुनावण्यात आलेल्या शिक्षेला आव्हान दिले होते.
या याचिकांवर सुनावणी पूर्ण होईपर्यंत शिक्षा स्थगित करावी, अशी विनंती करणारी याचिकाही त्यांनी सादर केली होती. उच्च न्यायालयाने बुधवारी त्यांची विनंती मान्य करीत, त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. या सर्वांना न्यायालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय देश सोडून जाता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. माजी राज्यसभा खासदार विजय दर्डा आणि त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा तसेच माजी कोळसा सचिव एच. सी. गुप्ता, दोन वरिष्ठ अधिकारी के. एस. क‘ोफा आणि के. सी. सामरिया, जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड आणि तिचे संचालक मनोज कुमार जयस्वाल यांनाही राऊस अव्हेन्यू न्यायालयाने दोषी ठरवले होते.