( खेड / प्रतिनिधी )
खेडमधील महाडनाका येथील डेरीडिलायट बेकरी मध्ये दुधाचे पाउच घेऊन काही मिनिटांसाठी गेलेल्या चालकाच्या गाडीतील 10 हजार रुपये लांबवल्याची घटना काल रविवार 17 जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद रमेश बसप्पा मदरी (34 रा. मिरज जि सांगली) यांनी पोलीस स्थानकात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रमेश मदरी हे दुध डेरीडीलायट बेकरी समोर थांबले होते. बेकरीचे मालक अमोल मोरे हे आल्यावर त्यांनी गाडीचा पुढील दरवाजा उघडा ठेवून दुधाचे पॅकेट देण्यासाठी गाडीच्या पाठीमागचा दरवाजा उघडला. आणि ते दूध देण्यासाठी बेकरी मध्ये गेले. गाडीचा पुढील दरवाजा उघडा होता. याच संधीचा फायदा घेत अज्ञाताने कॅबीन मध्ये असलेली 10 हजाराची रोकड रक्कम लंपास केली. रमेश हे गाडी सुरू करण्यासाठी आले असता केबिन मधील 10 हजार रुपये चोरीस गेल्याचे निदर्शनास आले.
याबाबतची तक्रार येथील पोलीस स्थानकात रमेश यांनी दिल्यानंतर अज्ञाताविरोधात भादविकलम 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस हवालदार कदम करत आहेत.