(राजापूर)
जिल्ह्यातील दरडग्रस्त व पूरप्रवण गावांचे प्रस्ताव लवकरच सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी सकाळीच दिले असून, त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राजापूर व लांजा तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापनाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही तालुक्यातील तहसीलदार व कर्मचाऱ्यांसमवेत त्यांनी बैठक घेतली. दोन्ही तालुक्यांतील दरडप्रवण व पूरग्रस्त गावांचा आढावा घेण्यात आला. ज्या ज्या ठिकाणी तत्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे, त्याची नोंद घेऊन तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले.
राजापूर तालुक्यातील धोपेश्वर, परुळे, शिवणे या गावांमधील दरडग्रस्त ग्रामस्थांचे कायमस्वरूपी स्थलांतर करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. लांजा तालुक्यातील खोरनिनकोसह अन्य दोन दरडग्रस्त गावातील लोकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले.
राजापूर शहराला भेडसावणाऱ्या पूररेषेचा आढावा घेऊन ती जास्तीत जास्त शिथिल करण्याचा प्रयत्न प्रशासकीय पातळीवर करण्यात येईल. त्यासाठी शुक्रवार दिनांक २८ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ११ वाजता ऑनलाईन प्रक्रियेद्वारे बैठक घेण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी म्हणाले.