(गुहागर)
शिवसेना आमदारांच्या अपात्रताप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालावर प्रतिक्रिया देताना गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी शाब्दीक हल्लाबोल केला. ही दडपशाही व झुंडशाही असून आता आम्हाला लढावेच लागेल, अशी परखड प्रतिक्रिया व्यक्त केली.
शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणी १९९९ ची पक्षघटना ग्राह्य धरत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना ही मुख्यमंत्री शिंदे यांचीच असल्याचा निकाल दिला आहे. निवडणूक आयोगाकडे २०१८ मध्ये केलेली घटनादुरुस्ती नाही, त्यामुळे ती ग्राह्य धरता येणार नाही, असे सांगत आमदार अपात्रतेची याचिका त्यांनी फेटाळून लावत हा निकाल दिल्याने याविरोधात राज्यभरात वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत.
आमदार जाधव म्हणाले, मुळातच हा आमचा विषय सुप्रीम कोर्टाकडे पेडींग आहे. सुप्रीम कोर्टालासुध्दा निवडणूक आयोगाच्या समितीवरुन काढून टाकण्यात आले आहे. याबद्दल काय बोलावे हेच समजत नाही. देशात लोकशाही राहिलेली नाही, दडपशाही व झुंडशाही चालू आहे. यासाठी आम्हाला लढावे लागलच शिवाय देशातील जनतेनेच उभे राहिले पाहिजे व हे ठरवून लोकशाही वाचविण्यासाठी पुढे आले पाहिजे.