(लखनौ)
विजयी लक्ष्य ३१२ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघ १७७ धावांत गारद झाला. द. आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांनी कांगारूंची दाणादाण उडविली. एकवेळ त्यांची ६ बाद ७० अशी दारुण स्थिती होती. त्यातून त्यांना सावरताच आले नाही. पाच प्रमुख फलंदाज स्वस्तात बाद झाल्याने कांगारूंच्या फलंदाजीत काही रामच उरला नाही. एंगिडी, रबाडा आणि यानसेन यांच्या वेगवान गोलंदाजीला कांगारूंकडे उत्तर नव्हते. फक्त लबुशेनने चिवट झुंज दिली. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलिायाचा 134 धावांनी पराभव केला आहे. यामुळे पाचवेळा चॅम्पियन ऑस्ट्रेलियन संघाचा या विश्वचषकातील हा सलग दुसरा पराभव ठरला आहे.
डी कॉकने झंझावाती खेळी खेळली आणि 90 चेंडूत शतक झळकावले. हे त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील 19वे शतक होते आणि या विश्वचषकातील सलग दुसरे शतक होते. डी कॉकने श्रीलंकेविरुद्धही 100 धावांची इनिंग खेळली होती.
कांगारूंना चांगला प्रारंभ मिळाला नाही. सहाव्या षटकात मिचेल मार्श (७) आणि सातव्या षटकात वॉर्नर (१३), ही सलामी जोडी तंबूत परतली. २७ धावांत सलामी जोडी गारद झाली. त्यानंतर नवव्या षटकात स्टीव्हन स्मिथ बाद झाला आणि ऑस्ट्रेलियन फलंदाजीचे कंबरडे मोडले. पॉवर प्लेमध्ये ५० धावा निघाल्या. पण त्यासाठी टॉपच्या तीन फलंदाजांचे द्यावे लागले. द. आफ्रिकेचे क्षेत्ररक्षण लाजवाब, गोलंदाजी अचूक आणि भेदक होती. स्मिथला बाद देण्याचा निर्णय संशयास्पद होता. लबुशेन (४६) आणि मॅक्सवेल (३) महत्त्वाचे बळी केशव महाराजने घेतले. जोश इंग्लिसची (५) रबाडाने दांडी उडविली आणि स्टॉयनिसला (५) सुद्धा रबाडाने बाद केले. १८ षटकांत कागारूंची ६ बाद ७० अशी दारुण स्थिती होती. त्यातून कांगारू सावरूच शकले नाहीत. लबुशेन आणि स्टार्कने सातव्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी केली. ही भागीदारी कांगारूंची सर्वोच्च भागीदारी ठरली.
All-round excellence helps South Africa continue their victorious run in the #CWC23 💪#AUSvSA 📝: https://t.co/GS4t9OwQlM pic.twitter.com/lOmGGsHblI
— ICC (@ICC) October 12, 2023
स्टार्कने २७ धावा काढल्या. ही दुस-या क्रमांकाची धावसंख्या ठरली. लबुशेन आठव्या क्रमांकावर बाद झाला. त्याने ७४ चेंडूत ४६ धावा काढल्या. कागारूंचा डाव ४०.५ षटकांत १७७ धावांत आटोपला. द. आफ्रिकेने १३४ धावांनी विजय मिळविला. द. आफ्रिकेतर्फे मार्को यानसेनने ५४ धआवांत २ बळी, केशव महाराजने ३० धावांत २ बळी घेतले.
पाचवेळा चॅम्पियन ऑस्ट्रेलियन संघाचा या विश्वचषकातील हा सलग दुसरा पराभव आहे. पहिल्या सामन्यात त्यांना भारताविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकन संघाचा हा सलग दुसरा विजय आहे. पहिल्या सामन्यात त्याने श्रीलंकेचा पराभव केला होता. क्विंटन डी कॉकला त्याच्या शतकासाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.