रत्नागिरी : बदलत्या काळानुसार आधुनिक पद्धतीने शेती करून उत्पादनात वाढ करण्यासाठी शेतकर्यांना थेट शिवारातून अवघ्या काही क्षणात माती परीक्षण करता येणार आहे. खरीप हंगामाच्या आरंभी ही सुविधा उपलब्ध झाली असून हंगामाला सुरुवात करण्यासाठी माती परीक्षणाच्या सुविधेचा लाभ शेतकर्यांनी घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
कृषी वैज्ञानिकांच्या मते पिकाच्या यशस्वी उत्पादनासाठी शेतजमिनीचे आरोग्य सदृढ राहणे महत्त्वाचे ठरते. त्यामुळे पिकाच्या लागवडीपूर्वी मातीची चाचणी करणे अर्थात माती परीक्षण करणे गरजेचे असते, माती परीक्षण करून जमिनीत कमतरता असलेल्या घटकांची पूर्तता करून पिकाचे चांगले उत्पादन प्राप्त करता येऊ शकते, परिणामी शेतकर्यांच्या उत्पन्नात दुपटीने वाढ होते. अनेक शेतकरी बांधवांना माती परीक्षणाचे महत्त्व माहिती असते, पण त्यासाठी केला जाणारा आटापिटा लक्षात घेऊन शेतकरी बांधव माती परीक्षण करण्यासाठी टाळाटाळ करताना आपल्याला दिसतात.
माती परीक्षण करायचे म्हटले की ठराविक प्रमाणात माती टेस्टिंग करण्यासाठी लॅबमध्ये पाठवावी लागते, मग तिथे मातीचे परीक्षण केले जाते आणि त्यानंतर तब्बल आठवड्याभरात माती परीक्षणाचा रिपोर्ट हा आपल्या हातात येतो. हा एवढा आटापिटा आणि याला लागणारा वेळ यामुळे शेतकरी बांधव माती परीक्षण करतच नव्हते.
या जुन्या पद्धतीला छेद देत आता माती परीक्षण अवघ्या काही मिनिटात करता येणे शक्य झाले आहे. शेतकर्यांना थेट शिवारातून माती परीक्षण करण्याची सुविधा आनलाईन उपलब्ध झाली आहे. अवघ्या काही मिनिटांत मोबाईलद्वारे माती परीक्षणाची सुविधा करण्यात आली आहे. यासाठी शेतकर्यांनी पोर्टेबल किटद्वारे माती परीक्षण करण्यासाठी पाच ग्रॅम माती परीक्षानळी सारख्या दिसणार्या यंत्रात टाकावी लागणार आहे.
या यंत्राला ब्लू टूथ कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून दिली गेली आहे. या यंत्राला ब्लू टूथ द्वारे आपल्या मोबाईलशी कनेक्ट केल्यानंतर अवघ्या काही सेकंदात परीक्षणाचा अहवाल प्राप्त होणार आहे.