( रत्नागिरी /प्रतिनिधी )
बौद्धजन पंचायत समिती तालुका रत्नागिरी, भारतीय बौद्धमहासभा (आद. मिराताई प्रणित), दि बुदिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्धमहासभा (मोकळे गट), भिम युवा पँथर रत्नागिरी या चार संघटनांच्या वतीने थिबा राजांचे प्रार्थना स्थळ (डी.एस.पी. साहेबांच्या) बंगल्या शेजारी असणाऱ्या जागेसंदर्भात शिवाजीनगर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन चर्चा विनिमय करण्यासाठीं शनिवारी ( दिनांक २६ ऑगस्ट २०२३) बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीचे अध्यक्षस्थान प्रकाश पवार यांनी भुषविले. यावेळी प्रितम आयरे, बौद्धजन पंचायत समिती सुहास कांबळे, वी बी मोहिते, मारुती कांबळे, तुषार जाधव, मंगेश कांबळे आदी उपस्थित होते.
बौद्ध राजा थिबा इंग्रजांविरुद्ध उठाव करू नये म्हणून त्याच्या देशापासून दूर अपरिचित ठिकाणी नजरकैदेत ठेवण्याचा निर्णय घेतला गेला. त्या काळात रत्नागिरीला दळणवळणाची सोय नव्हती. १६ एप्रिल १८८६ मध्ये थिबा राजा, त्याची पत्नी सुपायलात आणि दोन लहान मुलींसह मद्रासमार्गे येथे आणले गेले व रत्नागिरीत स्थानबद्ध केले. थिबा राजांचे प्रार्थनास्थळ असलेली जमीन समाजाच्या ताब्यात मिळावी याकरिता अनेक वर्षापासून मागणी करण्यात आली. त्यानंतर शासनाकडून १५ गुंटे जागा देतो असे आश्वासन दिले गेले. सगळ्या संस्थांच्या वतीने योग्य पद्धतीने पाठपुरावा झाला नसल्याने अद्याप जमीन समाजाच्या ताब्यात मिळालेली नाही. मात्र आता याच जागेसंदर्भात बौद्ध समाजातील तीन धार्मिक संघटना व एक सामाजिक संघटना एकत्र येऊन जागा ताब्यात घेण्यासाठी चारही संघटनांनी आता कंबर कसली आहे.
या बैठकीत डीएस पी बंगला, थिबा राजवाडा, थिबा पॅलेस अशा रत्नागिरीतील तीन जागा शासनाच्या ताब्यात आहेत. त्या जागेसंदर्भात बैठकित चर्चा करण्यात आली. उपस्थित कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ट्रस्ट स्थापन करण्याचा एकमताने ठराव करून राजा थिबाकालीन बुद्ध विहार चॅरिटेबल ट्रस्ट असे नाव ठेवण्यात आले. तसेच बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा देखील करण्यात आली. शासनाच्या ताब्यात असलेली जागा आपल्या ताब्यात घेऊन एखादी भव्यदिव्य वास्तू कशी निर्माण करता येईल यासाठी सर्वजण प्रयत्न करणार असल्याचे भीम युवा पँथर संघटनेचे अध्यक्ष प्रीतम आयरे यांनी यावेळी सांगितले.
२१ जणांची कार्यकारणी जाहीर
यावेळी दहा सदस्य आणि अकरा पदाधिकारी अशी एकूण २१ जणांची जंबो कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यामध्ये ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश रा. पवार, उपाध्यक्ष मारुती बी. कांबळे, उपाध्यक्ष भगवान जाधव, सचिव विजय बा. मोहिते , सहसचिव तुषार भा.जाधव, सहसचिव सुहास वि. कांबळे, सहसचिव शशिकांत कांबळे, खजीनदार प्रितम आयरे, सल्लागार ॲड. शिवराज जाधव, सल्लागार मंगेश सावंत, अंतर्गत हिशोब तपासणीत विजय जाधव, सदस्य रविंद्र पवार, शरद सावंत, दिपक तु. जाधव, तुषार पवार, वसंत मोहिते, रमेश मोहीते, सुनिल (भाई ) जाधव, मुकुंद सावंत, अँड. प्रविण कांबळे, विजय आयरे या एकवीस जणांची निवड करण्यात आली असून उपस्थित कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.