सॉफ्ट ड्रिंकमधून गुंगीचे औषध देऊन शासकीय अधिकारी असलेल्या तरूणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. त्यानंतर त्या विकृत आरोपीने तरूणीचे अश्लील व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून जवळपास १७ लाख रुपये उकळले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फहीम नईम सय्यद (वय, ३३) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित तरुणी ही सांगली येथे राहत असून पुण्यात येत असताना तिची फहीम सय्यद याच्याशी बसमध्ये ओळख झाली. त्यावेळी दोघांनी एकमेकांना आपले मोबाईल नंबर दिले. त्यानंतर त्यांच्यात संभाषण होऊ लागले. दरम्यान, पीडिता २ नोव्हेंबर २०२२ ला पुण्यात पुस्तक घेण्यासाठी गेली असता तिची आरोपीशी पुन्हा भेट झाली. पुस्तकांची खरेदी झाल्यानंतर आरोपीने जेवण करण्यासाठी पीडिताला बालगंधर्व चौकातील हॉटेलमध्ये नेले. तिथे आरोपीने पीडिताला सॉफ्ट ड्रिंक्समधून गुंगीचे औषध देऊन बालगंधर्व रंगमंदिरसमोरील विजय लॉज येथे घेऊन गेला आणि तिच्यावर बलात्कार केला. एवढेच नव्हेतर आरोपीने तरुणीचा अश्लील व्हिडिओ देखील तयार केला.
या घटनेनंतर आरोपीने दोन दिवसांनी पीडिताला फोन करत तिचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. त्याबदल्यात त्याने वारंवार पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली. बदनामीच्या भितीने तरुणीने महिन्याभरात आरोपीला १७ लाख ८९ हजार रुपये दिले. मात्र, तरीही आरोपीची पैशांची मागणी थांबत नसल्याने तरुणीने शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली.