(रत्नागिरी)
जिल्ह्यांतर्गत बदली करून घेण्यासाठी ऑनलाईन प्रक्रियेद्वारे खोटी माहिती भरून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाची फसवणूक केल्याचा ठपका बसलेल्या ७ तालुक्यातील ‘त्या’ १४ शिक्षकांवर कोणती कार्यवाही होते, याकडे शिक्षण क्षेत्रासह जिल्हावासियांनी नजरा रोखून धरल्या आहेत.
ऐजाज महमूद इब्जी, अनुराधा दीपक पवार, प्रमोद विष्णू कुंभार (चिपळूण), अनुराधा सुनील देसाई (दापोली), विकास रंगराव पाटील, स्नेहा सुहास आठवले (गुहागर), सुदेश हिरामण जाधव (खेड), नरेंद्र गंगाराम पवार, सुदिन बाबू चव्हाण, शैला सुभाष पराडकर, सुभाष महादेव पराडकर (लांजा), नितांजली शिंगे (रत्नागिरी), सुशिल तानू जाधव, रवींद्र कानू दर्डी (संगमेश्वर) या शिक्षकांनी जि.प.च्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या जिल्हांतर्गत ऑनलाईन बदली प्रक्रियेत चुकीची माहिती व कागदपत्रांच्या आधारे अर्ज भरला होता. ही बाब शिक्षण खात्याच्या निदर्शनास आल्याने शिक्षणाधिकारी वामन जगदाळे यांनी दोषी शिक्षकांना नोटीसा बजावून १६ मार्च रोजी रत्नागिरीतील शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनात सुनावणीसाठी बोलावले आहे. संबंधित शिक्षक या सुनावणीत योग्य तो खुलासे करून कार्यवाही टाळतात की कारवाईला समोर जातात? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.