(गोंदिया)
भारतीय सैन्य दलात कार्यरत जवानाचे मंगळवार ३ ऑक्टोबर रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले होते. जवानाचे मृतदेह सिमला येथून कामठी येथील सैन्य दलाच्या कार्यालयात काल सायंकाळी सात वाजता पोहोचला असून आज तो कामठी येथून त्यांच्या स्वगावी सकाळी सहा वाजता रवाना करण्यात येणार आहे. तर सकाळी दहा वाजता महालगाव येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येईल त्यानंतर शासकीय इत्तमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. देवीप्रसाद (मुन्ना) राधेश्याम लिल्हारे (४३) रा. महालगाव ता. जि. गोंदिया असे मृतक जवानाचे नाव आहे.
देवीप्रसाद हे हिमाचल प्रदेश येथील सिमला येथे भारतीय सैन्य दलात हवालदार पदावर कार्यरत होते. मंगळवारी कवायती दरम्यान त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला. यातच त्यांची प्राणज्योत मालवली. शासकीय सोपस्कार पार पाडल्यानंतर देवीप्रसाद यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी रवाना करण्यात आला. शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडणार असल्याची माहिती सैन्य दलातर्फे देण्यात आली.