राजापूर : शहरातील रानतळे येथील सड्यावर संशयास्पदरित्या मृत्यू झालेल्या राजेश वसंत चव्हाण (40, राह.चव्हाणवाडी राजापूर) याच्या खूनाचा अवघ्या बारा तासाच्या आत छडा लावण्यात राजापूर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी रूकसार उर्प सलमान मोहमद सलमानी (25, रा.उत्तरपदेश सध्या राजापूर) याला अटक करण्यात आली असून त्याने खुनाची कबुली दिल्याची माहिती पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांनी दिली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चव्हाणवाडी राजेश चव्हाण हे सोमवारी रात्रीपासून बेपत्ता झाले होते. काल सायंकाळी रानतळे पिकनिक स्पॉटपासून काही अंतरावर धोपेश्वर गुरववाडीकडे जाणाऱ्या रस्त्यापासून सुमारे 50 मीटर अंतरावर सड्यावर त्याचा मृतदेह आढळून आला. राजेश याच्या डोक्यावर गंभीर जखमा असल्याने त्याचा घातपात झाल्याचा अंदाज व्यक्त होत होता. त्यामुळे पोलिस निरीक्षकश्री परबकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरविली.
राजेश हा सोमवारी रात्री अन्य एका इसमासोबत रिक्षातून रानतळे येथे गेल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपासकार्य राबवत संशयित म्हणून रूकसार उर्फ सलमान मोहमद सलमानी याला आज सकाळी ताब्यात घेतले. त्याला पोलीस खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिस निरीक्षक श्री परबकर यानी दिली. रूकसार हा राजापूर शहरातील एका सलूनमध्ये कामाला आहे. रूकसार आणि राजेश हे काही काळ एकत्र सलुनमध्ये काम करत होते. दरम्यान राजेश याने रूकसार याला ‘तुझ्या पत्नीचे अश्लिल व्हीडीओ माझ्या मोबाईलमध्ये असून 30 हजार रूपये दे अन्यथा मी ते व्हीडीओ व्हायरल करेन’ अशी धमकी दिली होती. याचा राग मनात धरून रूकसार याने सोमवारी सायंकाळी राजेश याला रानतळे येथे नेले. त्याठिकाणी राजेश याने दारू पिल्यानंतर त्याच्या डोक्यात दगड घालून त्याला ठार केल्याचे पोलीस जबाबात सांगितल्याचे श्री परबकर यांनी सांगितले.
राजापूर पोलिसांनी अवघ्या काही तासातच खूनाचा छडा लावल्याने कौतुक होत आहे. याकामी राजापूर पोलिस निरीक्षक जनार्दन परबकर यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक मधुकर मौळे, श्रीम.वेंगुर्लेकर यांच्यासह सर्व कर्मचाऱयांनी मेहनत घेतली.