(रत्नागिरी)
स्वातंत्र्यवीर सावरकर व त्यांचे बंधू हेसुद्धा स्वातंत्र्ययुद्धात अग्रेसर होते. ते प्रत्यक्षात कार्य करत असताना या तिघांच्या कुटुंबीय व पत्नीला काय काय सहन करावे लागले, खूप हालअपेष्टा सहन करून राष्ट्राचा संसार पुढे नेण्यासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या त्या तिघी. म्हणजे सावरकर घराण्यातील यशोदाबाई गणेश सावरकर, यमुनाबाई विनायक सावरकर व शांताबाई नारायण सावरकर या तीनही व्यक्तिरेखा साकारत अभिनेत्री अपर्णा चोथे यांनी स्वातंत्र्यपूर्व काळ उभा केला.
निमित्त होते रविवारी रात्री येथील सावरकर नाट्यगृहात झालेल्या त्या तिघी या नाट्यप्रयोगाचे. महाराष्ट्र शासन पर्यटन संचालनालय, विवेक व्यासपीठ, पतितपावन मंदिर संस्था आणि श्री भागोजीशेठ कीर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सावरकर विचार जागरण सप्ताहानिमित्त हा प्रयोग रंगला. क्रांतिकार्यात हालअपेष्टा सोसणाऱ्या, तरीही हार न मानता राष्ट्राचा संसार पुढे नेणाऱ्या या वीरांगनांची शौर्यगाथा पाहताना रत्नागिरीकर भारावून गेले.
स्वातंत्र्यसंग्रामातील सावरकर कुटुंबियांच्या घरातील बंधू त्रयीच्या पत्नींचे योगदान मांडणाऱ्या त्या तिघी या डॉ. शुभा साठे लिखित कादंबरीवर आधारित ‘त्या तिघी.. स्वातंत्र्यकुंडातील अज्ञात समिधा’ हा अभिनेत्री अपर्णा चोथे यांनी एकपात्री नाट्यप्रयोग रंगवला. या नाट्याला रत्नागिरीकर, सावरकरप्रेमी रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
या प्रयोगाची संकल्पना, संहिता लेखन अपर्णा चोथे यांचे असून, सावरकर घराण्यातील यशोदाबाई गणेश सावरकर, यमुनाबाई विनायक सावरकर व शांताबाई नारायण सावरकर या तीनही व्यक्तिरेखा त्यांनी समरसून साकारल्या. १९०० पासूनचा तो रोमांचक काळच रसिकांसमोर उभा केला. सावरकर बंधूंचा त्याग, पराक्रम, कष्ट इतिहासात नोंदवला गेला आहे; पण हा त्याग, पराक्रम करत असताना त्यांच्या घरातील स्त्रिया कशा जगल्या, कष्टाचे आयुष्य अनेकींच्या वाट्याला येते. पण आनंदी आणि रसाळ मन, उदात्त विचार आणि दुःखाचे हलाहल पिऊनही न ढळणारी देशनिष्ठा हे त्यांचे विशेष गुण त्यांना अढळपदी नेऊन बसवतात. अशा, आपल्या पतींच्या राष्ट्रकार्याची धुरा निष्ठेने सांभाळणार्या वीरांगनांची शौर्यगाथा या एकपात्री प्रयोगाद्वारे रंगमंचावर आली.