तौक्ते चक्रीवादळातील आपदग्रस्तांना राज्य शासनाने भरघोस मदत करणे आवश्यक असून राज्य शासनाने आर्थिक मदतीचे जुने निकष बाजुला सारून कोकणातील आपदग्रस्तांना मदत द्यावी अशी मागणी काँग्रेसच्या माजी आमदार अँड. सौ. हुस्नबानू खलिफे यांनी केली आहे. अँड. खलिफे यांनी तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या तालुक्यातील जैतापूर, अणसुरे, नाटे, साखरीनाटे, आंबोळगड परिसरात भेट देत पहाणी केली.
कोकणातील आपदग्रस्तांवर कायमच अन्याय झाला आहे. अनेक चक्रीवादळे आणि नैसर्गिक आपत्ती काळातील आर्थिक मदत शेतकऱ्यांना मिळालेली नाही, जी मिळाली तीही अपुरीच असले. त्यामुळे या तौक्ते चक्रीवादळात शासनाने आर्थिक मदतीचे नव्याने निकष तयार करून त्या प्रमाणे मदत करावी अशी मागणी अँड. सौ. खलिफे यांनी केली आहे. सध्या जे निकष आहेत ते २५ ते ३० वर्षे जुने आहेत. ते बदलणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमुद केले.
या वादळात राजापूर तालुक्यात आणि कोकण किनारपट्टीवर मोठया प्रमाणावर घरे, गोठे, माड, आंबा व काजू पिकांचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे घरे आणि गोठयांनाही चांगली नुकसान भरपाई मिळाली पाहिजेच पण झाडांच्या बाबतीतही विशेष आर्थिक मदत मिळाली पाहिजे असेही अँड. सौ. खलिफे यांनी नमुद केले. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांना पत्र देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या पहाणी दौऱ्याप्रसंगी नगराध्यक्ष अँड. जमिर खलिफे यांसह स्थानिक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.