(मुंबई)
भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ सोमवारी एका वृत्तावाहिनीवरून प्रसारित झाल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. या व्हिडिओमुळे विरोधकांच्या हातात आयतंच कोलीत मिळालं आहे. या प्रकरणाचे प्रकरणाचे पडसाद आज विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही उमटले. ठाकरे गटाचे आमदार अनिल परब आणि अंबादार दानवे यांनी याप्रकरणी राज्य सरकारने चौकशी करावी अशी मागणी केली. अनिल परब यांनी किरीट सोमय्या यांच्याबरोबर या व्हिडिओतील महिला कोण, याचा शोध घ्यावा अशी मागणी गृहमंत्र्यांकडे केली.
किरीट सोमय्या यांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणावर आता शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. हा व्हिडिओ भाजपनेच व्हायरल केल्याचा गंभीर आरोपही सुषमा अंधारे यांनी केला आहे. सुषमा अंधारे यांनी म्हटलं की, किरीट सोमय्या यांनी केलं ते वाईटच आहे. पण भाजपने अनेक गोष्टी लपवल्या आणि जिरवल्या आहेत.
अंधारे म्हणाल्या की, व्हायरल झालेल्या या व्हिडिओबाबत चर्चा करावी असा हा व्हिडिओ नाही. महिलांची गोपनीयता ठेवली पाहिजे. मात्र हा व्हिडिओ देखील भाजपनेच व्हायरल केला आहे. अनेक अस्वच्छ लोक सोबत घेतल्यावर त्यांच्यावर आरोप करणारा माणूसच अस्वच्छ आहे, हे त्यांना दाखवायचं आहे.
या प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस खरंच कारवाई करतील का? हा प्रश्न आहे. या अगोदर त्यांच्याकडे अनेक जणांनी कारवाई करण्याची मागणी केली असून त्याचं त्यांनी काय केलं, हे सर्वांना माहित आहे. किरीट सोमय्या यांची भाजपमध्ये उपयुक्तता संपली आहे. त्यामुळे भाजपला त्यांना डॅमेज करून सोडून द्यायचं आहे, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे.