(खेड / भरत निकम)
जिल्ह्यात राजकारण सुसंस्कृतपणे सुरु होते. आमदार भास्कर जाधव यांनी बेताल वक्तव्य करीत घाणेरड्या राजकारणाचा पायंडा पाडत आहेत. ते राजकारणात काळा कलंक झाले आहेत. काही वर्षांपूर्वी चंद्रकांत चाळके, राजेंद्र आंब्रे, विशाल घोसाळकर, जीवन आंब्रे यांना सोबत घेवून मतदार संघ फिरलात, अनेक कार्यक्रम केलेत, उध्दव ठाकरेंची सभा घेतलीत. तेव्हा ते चोर म्हणून दिसले नव्हते का? अशी टीका शिंदे गटाचे प्रवक्ते आणि आमदार योगेश कदम यांनी उबाठा गटाचे नेते व आमदार भास्कर जाधव यांच्यावर केली आहे.
उबाठा गटाने हकालपट्टी केल्याची टीका केल्यानंतर जामगे येथील माजी मंत्री रामदास कदम यांच्या निवासस्थानी गुहागर मतदार संघातील राजेंद्र आंब्रे, चंद्रकांत चाळके, विशाल घोसाळकर, जीवन आंब्रे यांनी समर्थकांसह शिंदे गटाचे प्रवक्ते आणि आमदार योगेश कदम यांच्या हस्ते पक्षप्रवेश केला. ते पुढे म्हणाले, भास्कर जाधव हे ज्यांना नेते मानतात. त्यांनी कोविडच्या काळात मृतदेहांसाठी लागणाऱ्या साडे सहाशेच्या पिशव्या साडेतीन ते सहा हजारांना खरेदी केल्या. ही त्यावेळी मोठी चोरी तुमच्या नेत्यांनी केली आहे. हे सर्वश्रुत आहेच, अशी टीका करुन दुसऱ्यांकडे बोट दाखवत असताना आपल्याकडेही बोटं असतात. याचा विसर जाधवांना पडलेला असावा. ज्या लोकांवर चोरीचे आरोप करताहेत. त्यांनाच घेऊन पक्षाची बांधणीकरिता दौरे केलेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामामुळे प्रभावित होऊन कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. म्हणून ते बेताल वक्तव्य करत आहेत. पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर बाहेर पडलेल्यांना तुम्ही चोर म्हणता. ज्या लोकांना सोबतीला घेऊन फिरत होता, तेव्हा ते चोर वाटले नव्हते का? असा खडा सवालही आमदार कदम यांनी केला आहे.
२५ सप्टेंबर रोजी राजीनामा दिला – चंद्रकांत चाळके
जिल्हाप्रमुख यांच्याकडे २५ सप्टेंबर रोजी पदाचा आणि पक्षसदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर भास्कर जाधव यांनी हकालपट्टीची घोषणा केली, हे हास्यास्पद आहे, असे लोटे सरपंच चंद्रकांत चाळके यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यावर सांगितले.
आमदार योगेश कदमांकडून पक्षात स्वागत
गुहागर विधानसभा मतदारसंघातील लोटे विभागातील उबाठा गटातून राजेंद्र आंब्रे, चंद्रकांत चाळके, जीवन आंब्रे, विशाल घोसाळकर आदींनी समर्थकांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. गटाचे नेते रामदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे सांगितले. त्यांचे पक्षात स्वागत शिंदे गटाचे प्रवक्ते आणि आमदार योगेश कदम यांनी स्वागत केले होते.
आगे बढोच्या घोषणा
पक्षप्रवेश कार्यक्रम सुरु असताना शिंदे गटाचे नेते व माजी मंत्री रामदास कदम यांच्या समवेत काम करण्यासाठी गुहागर मतदार संघातील अनेक पदाधिकारी यांनी प्रवेश केला. पक्षात स्वागतापूर्वी ‘ रामदास भाई आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ ‘ योगेश दादा आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता.