(मुंबई)
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीला शरद पवारांचा पाठिंबा होता, असा गौप्यस्फोट केल्यानंतर आता राज्याच्या राजकारणात आणखी एक मोठा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केला आहे. महाविकासआघाडी सरकार असताना उद्धव ठाकरे भाजपसोबत जाण्यासाठी तयार होते, असा दावा सुनिल तटकरे यांनी केला आहे. याशिवाय सुनिल तटकरे यांनी संजय राऊत यांच्यावरही घणाघाती टीका केली आहे.
तटकरे म्हणाले की, आमच्याबद्दल व अजितदादांबद्दल बोलताना सांभाळून बोला, अशी विनंती आम्ही राऊत यांना केली होती, पण तरी त्यांनी जी भाषा वापरली ते योग्य नाही. ‘सामना’च्या अग्रलेखात संजय राऊत यांनी दादांबद्दल गरळ ओकली, ते यापूर्वीही बोलत होते. ते ज्या दादांचा “सिंचन” दादा उल्लेख करतात, त्यांच्याशिवाय महाविकासआघाडी झाली नसती,’ अशी टीका सुनिल तटकरे यांनी केली आहे.
उद्धवजींनी वाईट वाटून घेऊ नये, मात्र कोविड काळातही सरकार जे चांगलं चाललं ते दादांमुळे चाललं. एका बैठकीला दादा गेले नाही म्हणून संजय राऊत यांना राग आला, त्यावेळी नार्वेकर आणि एकनाथ शिंदे सुद्धा होते. उद्धवजी भाजपबरोबर जाण्याची वेळ आली आहे, असं ते दीड ते दोन तास सांगत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून आल्यावरची ही घटना आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी याबद्दल बोलू नये, असे सुनिल तटकरे यांनी केला आहे.
संजय राऊतांवर टीका करताना सुनिल तटकरे म्हणाले कोणत्याही घोटाळ्यात आम्हाला आरोपी केले नाही,उलट तुम्ही आरोपी होतात आणि आज जामिनावर आहात,हे लक्षात ठेवा. संजय राऊत खासगीत उद्धवजींना अरे तुरे बोलतात, पवारसाहेब आजारी असताना उद्धव ठाकरे बघायला गेले नाहीत, तेव्हा संजय राऊत उद्धव ठाकरेंवर टीका करत होते, असा दावाही सुनिल तटकरे यांनी केला आहे.