(पुणे)
पुण्यात जागतिक मराठी संमेलन पार पड़ले. या कार्यक्रमात भाषण करताना शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना खोचक टोला लगावला. शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्या एका विधानाचा उल्लेख करत मला दिल्लीमध्ये संसद भवनात जाण्यास भीती वाटत असल्याचं म्हटलं आहे.
शरद पवार बोलताना म्हणाले की, सुशीलकुमार शिंदे आता म्हणाले की, ‘मी शरद पवारांच्या तालमीत तयार झालो आहे.’ पण असं कुणीतरी म्हटलं की मला भयंकर भीती वाटते. कारण याआधी कोणीतरी म्हटलं होतं की, मी शरद पवार यांचे बोट धरून राजकारणात आलोय. तेव्हापासून मी दिल्लीच्या संसदेत जाण्यासाठी घाबरतो,” असं विधान शरद पवारांनी केलं आहे. शरद पवारांच्या या विधानानंतर सभागृहात एकच हशा पिकला.
यावेळी सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या भाषणात म्हटले की, मी शरद पवार यांच्या तालमीत तयार झालेला कार्यकर्ता आहे. हाच धागा पकडत शरद पवारांनी पंतप्रधान मोदींना अप्रत्यक्ष टोला लगावला.
या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांना जागतिक मराठी पुरस्काराने गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला डॉ. पी. डी. पाटील, संमेलनाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर मुळे, सुशीलकुमार शिंदे, अभिनेते सयाजी शिंदे, नागराज मंजुळे, खासदार श्रीनिवास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.