(जाकादेवी / संतोष पवार)
संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब गावची सुकन्या तसेच देवरुख ऑफ आर्ट अँड डिझाईन कॉलेजची विद्यार्थीनी तेजश्री राहुल जाधव हिने नशामुक्त भारत अभियानांतर्गत रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून आपली कला सिध्द केली आहे.
निसर्गरम्य कोकणातील कला महाविद्यालयपैकी देवरुख कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाईन हे कॉलेज शैक्षणिक उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना कशी मिळेल याकरिता प्रयत्नशील असते. दरवर्षी २६ जून हा दिवस जगभर जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून विविध विधायक उपक्रमाच्या स्वरूपात साजरा केला जातो. अंमली पदार्थांच्या व्यसनात गुरफुटत चाललेली युवा पिढी हे राष्ट्रीय नव्हे, आंतरराष्ट्रीय स्तरावर एक भीषण समस्या होऊ बसली आहे.
DRUGS FREE INDIA DRUGS END ALL DREAMS या विषयावर कु. तेजश्री जाधव हिने आपल्या संकल्पनेतून अतिशय लक्षवेधी चित्र साकारले होते. जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेतील प्रथम क्रमांक प्राप्त झालेल्या कु. तेजश्री जाधव आणि तेजश्रीचे वडील श्री. राहुल बाबू जाधव यांना उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.यावेळी खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी एम . देवेंदर सिह, मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, प्रशिक्षणार्थी आय. ए. एस., डॉ. जस्मीन, प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, अप्पर पोलीस अधिक्षक जयश्री गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हानियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, प्रांत अधिकारी जीवन देसाई आदी उपस्थित होते.
कु. तेजश्री राहुल जाधव हिला चित्रकलेत कमालीची आवड आहे. यापूर्वी तिने अनेक विषयांवर चित्रं रेखाटली आहेत. तिच्या जिल्हा स्तरावरीय विशेष नैपुण्याची दखल घेत मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच, खेरशेत(ता.चिपळूण) संस्थेचे मुख्य प्रवर्तक व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजय शांताराम कदम यांच्यासह तिच्या कॉलेजातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी वर्ग तसेच सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.