(नाशिक /प्रतिनिधी)
आपापसात हेवेदावे करीत बसण्यापेक्षा स्वामी कार्यात आपले मन गुंतवा. स्वामीकार्य घराघरात पोहोचवा. स्वामीसेवेच्या माध्यमातून आपण विश्वशांती आणि राष्ट्रहिताचे कार्य करीत असतो. त्यामुळे ‘तू मेरे धामपर मै तेरे कामपर’ या उक्तीनुसार महाराज आपले प्रश्न सोडवत असतात. अशा शब्दात अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख गुरुमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे यांनी स्वामी कार्याची महती विशद केली.
अधिकमास अर्थात पुरुषोत्तम मासानिमित्त श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील गुरुपीठात श्रीसुलभ भागवत सप्ताहाची सांगता गुरुमाऊलींच्या अमृततुल्य हितगुजाने शनिवार दि. 5 ऑगस्ट रोजी झाली. यानिमित्ताने गुरुमाऊलींचा दर्शन सोहळा, एकदिवसीय सामुदायिक गुरुचरित्र पारायण हेही उपक्रम श्रद्धापूर्वक पार पडले. भागवत सप्ताहामध्ये झालेल्या सामूहिक सेवेची माहिती देतांना गुरुमाऊली म्हणाले की, भागवत सप्ताहामध्ये 260 सेवेकरी सहभागी झाले तर ‘ओम नमो भगवते वासुदेवाय’ या दिव्य मंत्राचा 12 लक्ष जप करण्यात आला.
रुद्रसूक्ताची 1400 आवर्तने झाल्यामुळे एक महारुद्र संपन्न झाला. त्याचप्रमाणे श्रीसूक्त, पुरुषसूक्त आणि श्रीविष्णुसहस्त्रनामाची सामुदायिक 21 हजार आवर्तने सेवेकर्यांनी केली. तर एक दिवसीय गुरुचरित्र पारायणात 400 सेवेकर्यांनी सहभाग घेतला. ही प्रचंड सेवा करणारे सेवेकरी भाग्यवंत आहेत. ‘योजक तत्र दुर्लभ:’ अशाच पद्धतीने प्रत्येक सेवा केली पाहिजे असे गुरुमाऊलींनी स्पष्ट केले.
स्वामीकार्य हे वैयक्तीक, कौटुंबिक, सामाजिक आणि राष्ट्रहिताचे असल्यामुळे स्वामीकार्यासाठी किमान दररोज एक तास वेळ दिल्यास तुम्ही घरी जाईपर्यंत महाराज आपले प्रश्न सोडवतात. असा अनेकांना अनुभव आला आहे. स्वामीकार्य करतांना कोणताही भेदभाव पाळला जात नाही. ‘सम सकला पाहू’ याच न्यायाने सेवाकार्य करावे, माणुसकी हीच संस्कृती आणि मानवता हाच धर्म ही शिकवण लक्षात घेऊन दीन दु:खितांसाठी कार्य करा असा उपदेश त्यांनी केला. रागी, बागी, नाडी, न्याय या गुणांनी युक्त होऊन काम केले तर समाजातील दु:खी लोकांच्या चेहर्यावर आनंद निर्माण होईल, असे गुरुमाऊलींना नमूद केले. यावेळी गुरुपुत्र श्री. चंद्रकांतदादा, श्री. नितीनभाऊ व श्री. आबासाहेब मोरे हेही उपस्थित होते.
मुंबईत महासत्संग व दर्शन सोहळा
मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात दि. 28 ऑगस्ट रोजी परमपूज्य गुरुमाऊली यांचा महासत्संग व दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. दुपारी 2 वाजेपर्यंत सेवेकर्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच दुबईमध्येही आगामी काळात तिसरा आंतरराष्ट्रीय महासत्संग सोहळा होणार आहे.