हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री मीना कुमारी यांनी आपल्या कारकिर्दीत एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. ‘साहिब बीबी और गुलाम’, ‘पाकीजा’, ‘मेरे अपने’, ‘बैजू बावरा’, ‘दिल अपना प्रीत पराई’ असे त्यांचे अनेक हिट चित्रपट आजही चंदेरी दुनियेतील व विशेष करून पूर्वीच्या लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत.
मीना कुमारी यांच्या आयुष्यात खरेतर आनंदाशिवाय सर्व काही होते. मीना कुमारीचे आयुष्य चित्रपटांमध्ये दिसलेल्या ग्लिझने भरलेले होते. पण त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक दु:ख झेलली आहेत. आयुष्याचा शेवटचा दिवसही त्यांनी खूप वेदनेत आणि एकाकीपणात घालवला होता. मीना कुमारी यांचे ३१ मार्च १९७२ रोजी निधन झाले होते.
मीना कुमारी यांनी जगाचा निरोप घेतला, त्यावेळी मीना कुमारीची चांगली मैत्रिण मानली जाणारी अभिनेत्री नर्गिस त्यांना भेटली होती. तसेच त्या मीना कुमारींना भावना दाटून म्हटल्या होत्या की, तुला मृत्यूच्या शुभेच्छा ! कारण मीनाच्या आयुष्यात चाललेल्या सर्व गोष्टी नर्गिसला चांगलेच ठाऊक होते.
मीना कुमारी यांनी दिग्दर्शक-निर्माता कमल अमरोही यांच्याशी विवाह केला. रिपोर्ट्सनुसार, मीना आणि कमल अमरोही यांचे वैवाहिक जीवन खूपच खराब होते. कमलने लग्नानंतर मीनावर बारीक नजर ठेवायला सुरुवात केली आणि तिच्यावर अनेक बंधने घातली.
एवढेच नाही तर मीना कुमारी यांना ते बंद खोलीत मारहाणही करायचे. ही अत्यंत धक्कादायक बाब होती. ज्याबद्दल खुद्द अभिनेत्री नर्गिसने खुलासा केला होता. नर्गिस दत्तने स्वतः मीनाच्या खोलीतून मारहाणीचे आवाज ऐकले होते, त्यामुळे ती सुद्धा खुप अस्वस्थ झाली होती.
मीना कुमारी यांच्या निधनानंतर नर्गिसने एक मुलाखत दिली होती, त्यामध्ये तिने सांगितले की, मीना कुमारीच्या खोलीतून मारहाणीचे आवाज येत होते. ‘चुप रहूंगी’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मीना आणि नर्गिस एकाच हॉटेलमध्ये थांबल्या होत्या. दोन्ही खोल्या आजूबाजूला होत्या. त्यावेळी त्यांनी हे आवाज ऐकल्याचे सांगितले. मीना कुमारी दुसऱ्या दिवशी रूममधून बाहेर आल्या तेव्हा नर्गिसला त्यांचे डोळे सुजलेले दिसले होते.
मीना कुमारी यांच्या निधनानंतर नर्गिस यांनी एक लेख लिहिला. या लेखात त्यांनी मीना कुमारी आणि त्यांच्या आयुष्याबद्दल लिहिले होते. मीनाच्या मृत्यूवर नर्गिस काही आठवणीना उजाळा देण्यासाठी या लेखात त्यांनी काही खुलासे केले. त्यावेळी त्यांनी “तुला मृत्यूच्या शुभेच्छा, आता पुन्हा या जगात पाऊल ठेवू नकोस” असे मीनाला नाईलाजाने बोलल्याचे स्पष्ट केले.
मीना कुमारीचे पती त्यांना नेहमी नियंत्रणात ठेवायला बघायचे. या गोष्टींमुळे मीना अस्वस्थ झाली होती आणि तिला एकटं वाटू लागलं. अशा परिस्थितीत मीना कुमारी यांनी दारूचे व्यसन लागले होते. जास्त मद्यपान केल्यामुळे त्यांना लिव्हर सिरोसिस झाला होता. असं म्हटलं जातं की, मीना कुमारी त्यांच्या शेवटच्या काळातही औषधांऐवजी दारु प्यायच्या.