(पुणे)
भाजपचे नेते, माजी नगरसेवक आणि पदाधिकारी गणेश बिडकर यांना कॉल करून तब्बल २५ लाख रूपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणी पुण्याच्या सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आला. बिडकर यांना २५ लाखाच्या खंडणीची मागणीचा थेट फोन आल्याने पुण्याच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
बिडकर यांना धमकी दिल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिडकर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, रामनवमीच्या दिवशी एका अज्ञात व्यक्तीने त्यांना व्हॉट्सॲप कॉल करून मराठी आणि हिंदी भाषेत शिवीगाळ केली. “तुला जास्त मस्ती आली आहे का? चुपचाप पंचवीस लाख रुपये दे” अशी धमकी देत त्यांच्याकडे पैशांची मागणी केली.
तसेच, पैसे नाही दिले तर तुझी बदनामी करू, असंही संबंधित अनोळखी व्यक्तीने बिडकर यांना धमकी दिली आहे. गणेश बिडकर देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जातात.