तुर्की आणि सीरियाला विनाशकारी भूकंपाचा धक्का बसल्याच्या घटनेला एक आठवडा पूर्ण झाला असला तरी ढिगारे उपसण्याचे काम अद्यापही संपलेले नाही. त्यामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या संख्येतही दररोज भर पडत असून ही संख्या सध्या ३४ हजारांच्या वर गेली आहे. तर एक लाखांहून अधिक जण जखमी झाले आहेत. ही जीवितहानी भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे झाली असली तरी भ्रष्टाचार, नियमांचे उल्लंघन करून असुरक्षित ठिकाणी आणि दर्जाशी तडजोड करून इमारती उभ्या केल्यानेच या हानीमध्ये मोठी भर पडल्याची टीका होत आहे.
भूकंपप्रवण क्षेत्रात रहात असलेल्यांना सुरक्षित घरे न दिल्याबद्दल बांधकाम व्यावसायिकांना दोषी ठरविण्यात आले असून एकूण १३० जणांना अटक वॉरंट बजावून त्यापैकी काहींना ताब्यातही घेण्यात आले आहे. सरकारने पडलेल्या इमारतींसाठी वापरल्या गेलेल्या साहित्याचे नमुने गोळा करण्यास सुरुवात केली असून त्यांची तपासणी केली जात आहे. दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा सरकारने दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपप्रवण भाग असल्याने तुर्कीमध्ये बांधकामासाठी काही नियम निश्चित करण्यात आले आहेत. मात्र, या नियमांची अभावानेच अंमलबजावणी केली जाते. त्यामुळेच बांधकामाचा खराब दर्जा असलेल्या आणि भूकंपाचा धक्का सहन करण्याची क्षमता नसलेल्या अनेक इमारती उभारल्या गेल्या आहेत. सोमवारी (ता. ६) ७.८ रिश्टर तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसताच या इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या आणि त्याखाली हजारो नागरिक गाडले गेले.
दरम्यान, तुर्की सरकारने भूकंपात पडलेल्या इमारतींच्या एकूण १३० बांधकाम व्यावसायिकांना ताब्यात घेतले आहे, तर काही जणांविरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहेत. बांधकाम नियमांचा भंग करत इमारतींची उभारणी केल्यामुळेच जीवित हानीमध्ये मोठी भर पडली, असा आरोप तज्ज्ञांनी केला आहे.
संयुक्त राष्ट्र संघाचे तब्बल १० ट्रक सिरियाच्या काही भागात पाठवण्यात आले आहेत. यात शेल्टर कीट, प्लॅस्टिक शिट, आरोग्य साधने आदी वस्तूंचा समावेश आहे. मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला असून तब्बल ३४ हजाराहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक नागरिक जखमी झाले आहेत. जे नागरिक बेघर झाले आहे आहे, त्यांच्या पुढे आता नवे संकट उभे राहिले आहे. भुकमरी आणि बेघर झाले असतांना जे नागरिक बचावले आहेत, आता त्यांना लुटमारीच्या घटनांना सामोरे जावे लागत आहे. आता पर्यन्त ४२ जणांना अटक करण्यात आली आहे.
तुर्कस्तान व सीरियातील भूकंपबळींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या दशकातील हा सर्वाधिक प्राणहानी करणारा असा हा विनाशकारी भूकंप ठरला आहे. तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगान या भूकंपग्रस्त क्षेत्रास सध्या भेट देत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेचे वरिष्ठ आपत्कालीन अधिकारी अॅडेलहेड मरशग यांनी या भूकंपग्रस्त प्रदेशात तब्बल दोन कोटी ३० लाख नागरिकांना झळ पोहचल्याची शक्यता व्यक्त केली आहे.