(संगमेश्वर / प्रतिनिधी)
तालुक्यातील तुरळ ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांच्या महामार्ग संदर्भात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्यांबाबत सरपंच सुवरे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडे पत्रव्यवहार केला होता. मात्र या विषयासंदर्भात प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.
अनेक महिन्यांपासून तुरळ ग्रामपंचायत हद्दीतून राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. तुरळ येथील ग्रामस्थांना कडवई ही एकमेव बाजारपेठे आहे, त्याचप्रमाणे रेल्वे प्रवाससाठी कडवई रेल्वे स्टेशन हे जवळचे रेल्वे स्थानक आहे. तुरळ-कडवई फाटा ते कडवई व अन्य आजूबाजूच्या अनेक गावातील नागरिकांना हायवेवरुन ये-जा करावी लागत आहे. याठिकाणी तुरळ-कडवई फाट्यावरुन पलीकडे जाण्यासाठी नागरिकांना ओव्हर फुटब्रीजची आवश्यक आहे. यासंदर्भातील मागणीचे निवेदन ही तुरळ गावचे सरपंच सूवरे यांनी महामार्ग प्राधिकरण विभागाला दिले आहे. परंतु या विषयासंदर्भात प्रशासनाला कोणतेही गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.
आमदारांच्या पत्राला केराची टोपली
मुंबई गोवा महामार्गावर २४ तास गाड्यांची वर्दळ असते. या भागात रस्ता ओलांडताना नागरीकांना ताटकळत उभे राहावे लागत असते. स्थानिक नागरीकांची समस्या लक्षात घेऊन तातडीने आमदार शेखर निकम यांनी देखील महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांला पत्र पाठविले. आमदार महोदयांनी हे पत्र ११-०४-२०२३ या तारखेला पाठविले आहे. मात्र आठ महिने उलटले तरीही अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी आमदारांच्या पत्राला ही केराची टोपली दाखवल्याचे चित्र आहे.
ओव्हर फुटब्रीजची आवश्यकताच
या परिसरात महामार्गावरून जाणारी वाहने प्रचंड वेग धारण करून मार्गक्रमण करत असतात. तुरळ-कडवई या भागात नागरिकांची वर्दळ देखील असते. वाहन चालकांसह
ग्रामस्थांना रस्ता ओलांडताना मोठी कसरत करावी लागते.याठिकाणी अपघात होण्याची शक्यता अधिक असल्याने या परिसरात ओव्हर ब्रीज उभारण्याची आवश्यकता आहे. ग्रामस्थांच्या मागणीबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना कोणतेही गांभीर्य नाही. एकूणच महामार्गावर निर्माण होणाऱ्या गैरसोयी सोडवण्यासाठी प्रशासन अपयशी ठरत आहे.
सरपंचांनी दिला उपोषणाचा इशारा
तुरळ ग्रामपंचायत सरपंच सुवरे यांनी १२-०५-२०२३ या तारखेला पत्र दिले होते. या पत्रातून त्यांनी महत्वाच्या मागण्या महामार्ग प्राधिकरण विभागाला केल्या होत्या. मात्र या पत्राला देखील कोणतेही लेखी स्वरूपात उत्तर न देता संबंधित विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी अन्यथा येणाऱ्या २६ जानेवारीला गावच्या ग्रामस्थांना घेऊन उपोषणाला बसण्याचा इशारा तुरळ ग्रामपंचायत सरपंच सहदेव सुवरे यांनी दिला आहे.
सरपंचांच्या ‘ या’ आहेत पाच मागण्या…
१) तुरळ स्टॉपजवळ पादचारी फुटब्रिज रॅम्पसह बांधण्यात यावा.
२) तुरळ डीकेवाडी ते तुरळ हरेकरवाडी गणपतीमंदिर पर्यंत हायवेलगत नवीन सर्विसरोड दोन्ही बाजूने करण्यात यावा.
३) तुरळ डीकेवाडी ते तुरळ हरेकरवाडी गणपती मंदिर सर्विसरस्त्याला स्ट्रीटलाईट बसविण्यात यावे.
४) तुरळ डीकेवाडी बैठक हॉलच्या शेजारी रस्त्याला संरक्षण भिंत बांधणे.
५) कडवई साळवीवाडी जवळील नदी पात्रातील गाळ काढणे, नदीची खोली व रुंदी वाढविणे.