(संगमेश्वर / प्रतिनिधी )
तुरंबव ता. चिपळूण येथे प्रतिवर्षाप्रमाणे दिनांक १५ ऑक्टोबर २०२३ पासून श्री शारदादेवी मंदिर तुरंबव येथे श्री शारदा देवीचा शारदोत्सव सुरू होत आहे.
पहिल्या दिवशी १५ऑक्टोबर देवीच्या रुप्यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होईल. दिनांक १५ ते २४ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत देवीचे दर्शन ओटी. साध्या नवसासोबत दररोज रात्रौ १० : ३० वाजता पारंपरिक जाखडी नृत्यनंतर भाविकांसाठी संतति विषयक नवस करणे तसेच फेडण्याचा कार्यक्रम सुरू होईल. व हा नवसाचा कार्यक्रम अत्यंत श्रद्धेने येणारे भाविकांसाठी शिस्तबद्धपणे पहाटेपर्यंत चालेल. या कालावधीत मंदिर देवीच्या दर्शनासाठी सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत खुले राहील. रात्री नऊ वाजता महाआरती व १० : ३० वाजता जाखडीनृत्य नंतर संतती विषयक नवस करणे. फेडण्याचा कार्यक्रम रात्रौ ११ : ३० वाजता सुरु झाल्यावर भाविकांना गाभाऱ्यात दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार नाही. मात्र देवीचे दुरूनच मुखदर्शन घेता येईल.
या कालावधीत एस.टी महामंडळाने चिपळूण -तुरंबव, सावर्डे -तुरंबव अशा विशेष बस फेऱ्या भाविकांच्या सोयीसाठी सुरू केल्या असून त्यांचे वेळापत्रक चिपळूण डेपो येथे लावण्यात येते. या कार्यक्रमासाठी कोकण रेल्वेने येणाऱ्या भाविकांना सावर्डे रेल्वेस्थानकात उतरावे लागेल. गाडीला सावर्डे येथे थांबा नसल्यास त्याने चिपळूण स्थानकात उतरून रस्त्याच्या मार्गाने तुरंबव पर्यंत प्रवास करावा लागेल.
भाविकांना उत्तम रीतीने दर्शन व्हावे व त्यांची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर न्यासाने सर्वतोपरी नियोजन केले आहे असे मंदिराच्या विश्वस्त मंडळाने कळविले आहे. तसेच याबाबत अधिक माहिती हवी असल्यास भाविक श्री शारदा देवी मंदिर चॅरिटी ट्रस्ट,तुरंबव यांच्याकडे मोबाईल क्रमांक ७७२००७५१९२/७७९६४७५१९२ वर संपर्क साधू शकतात. असे आवाहन श्री शारदादेवी मंदिर चॅरिटी ट्रस्ट तुरंबव यांनी केले आहे .