जम्मू-काश्मिरमध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार बर्फवृष्टी होत असल्यानं महामार्गांवरील वाहतूक तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आली आहे. श्रीनगरसह काश्मिरमधील अनेक भागांमध्ये बर्फवृष्टी होत असल्यामुळं रस्त्यांवर वाहनांची गर्दी कमी झाली आहे. रस्त्यांसह इमारती आणि झाडांवर बर्फाची चादर पसरल्यामुळं स्थानिकांना घराबाहेर पडणं फार कठीण होत आहे.
गुलमर्गमध्ये आठ, पहलगाममध्ये 14 आणि सोनमर्गमध्ये गेल्या 24 तासांत सुमारे तीन फूटांपर्यंत बर्फवृष्टी झाली आहे. जोरदार बर्फवृष्टी आणि खराब हवामानामुळं श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळं काश्मिर खोऱ्याचा देशातील उर्वरीत भागाशी संपर्क तुटला आहे.
जम्मू-काश्मिर आपत्ती व्यवस्थापन विभागानं जम्मू राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये हिमस्खलनाचा होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळं हवामान खातं आणि स्थानिक प्रशासनाकडून स्थानिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.