तिरुमला तिरुपती देवस्थानने पहिल्यांदाच मंदिराची एकूण संपत्ती जाहीर केली आहे. देशभरातील प्रसिद्ध असलेल्या मंदिरांमध्ये तिरुपती बालाजी मंदिराचं नाव नेहमीच अग्रक्रमाने घेतले जाते. तिरुपती बालाजी मंदिरात दर्शनासाठी जगभरातून भाविक येत असतात. देशभरातील श्रीमंत देवस्थानांच्या यादीत तिरुपती बालाजी मंदिराचे नाव घेण्यात येतं.
तिरुपती बालाजी मंदिर हे आंध्रप्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात आहे. हे मंदिर भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे. मंदिर न्यासाच्या बोर्डाने 2019 सालापासून आपली गुंतवणूक आणि गाईडलाईन्स आणखी मजबूत केल्या आहेत. तिरुमला तिरुपती देवस्थानमकडे नेमकी किती संपत्ती आहे या संदर्भात तिरुमला तिरुपती देवस्थानम म्हणजेच टीटीडीने प्रथमच खुलासा करत संपत्ती जाहीर केली आहे.
तिरुमला तिरुपती देवस्थानम मंदिर न्यासाने ट्रस्टकडील संपत्तीची माहिती दिली आहे. ट्रस्टकडे एकूण 10.3 टन सोने असून ते राष्ट्र्रीय बँकेत ठेवण्यात आले आहे. या सोन्याची किंमत जवळपास 5 हजार 300 कोटी रुपये इतकी आहे. या संदर्भात वृत्त एका प्रसिद्ध इंग्रजी दैनिकात आलं आहे. या वृत्तानुसार, तिरुमला तिरुपती देवस्थानम यांनी 1933 मध्ये स्थापनेनंतर पहिल्यांदाच संपत्तीची घोषणा केली आहे.
ट्रस्टकडे किती टन सोने
मंदिर ट्रस्टने सांगितले की, त्यांच्याकडे सध्या 10.3 टन सोने आहे. जे राष्ट्रीयकृत बँकेत डिपॉझिट करण्यात आले आहे. या सोन्याची किंमत सध्याच्या बाजार भावानुसार अंदाजे 5300 कोटी रुपयांपेक्षाही अधिक आहे. यामध्ये 2.5 टन सोन्याचे दागिने आहेत, त्यापैकी अनेक पुरातन वस्तू सुद्धा आहेत.
बँकेतील ठेवी
मिळालेल्या माहितीनुसार, बँकांमध्ये ट्रस्टच्या मोठ्या ठेवी आहेत. सुमारे 16000 कोटी रुपये बँकांमध्ये ठेवी असल्याची माहिती समोर आली आहे. टीटीडीचे कार्यकारी अधिकारी ए. व्ही. धर्मा यांनी सांगितले की, मंदिर ट्रस्टची एकूण संपत्ती 2.26 लाख कोटी झाली आहे. 2019 मध्ये मंदिर ट्रस्टकडे 13025 कोटी रुपयांच्या ठेवी होत्या. यामध्ये आता वाढ होऊन 15 हजार 938 कोटी रुपये इतकी झाली आहे. गेल्या तीन वर्षांत ही गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढली असून आता गुंतवणुकीत 2900 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
बालाजी मंदिरात भरभरून दान
तिरुमला तिरुपती मंदिरात भाविक भरभरून दान करत असतात. यामध्ये रोख रक्कम, सोने-चांदीच्या दागिन्यांसह इतरही मौल्यवान वस्तूंचा समावेश असतो.
प्रॉपर्टी किती
मंदिर ट्रस्टकडे वेगवेगळ्या ठिकाणी 7 हजार 123 एकर इतक्या परिसरात एकूण 960 मालमत्ता आहेत.
अफवांवर विश्वास ठेवू नका
मंदिर ट्रस्टने सांगितले की, सरप्लस फंड म्हणजेच अतिरिक्त निधी हा केवळ बँकांमध्येच गुंतवलेला आहे. भाविकांना विनंती आहे की, कोणत्याही प्रकारच्या खोट्या वृत्तांवर, अफवांवर विश्वास ठेवू नका. मंदिर ट्रस्टने आपल्याकडील रोख रक्कम, सोने हे बँकेत ठेवले असून सर्व व्यवहार पारदर्शक आहेत.