(हैदराबाद)
देशातील सर्वात श्रीमंत व प्रसिध्द मंदिर असलेल्या आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिर बोर्डाच्या अध्यक्षपदी सत्ताधारी वायएसआर काँग्रेस पक्षाचे आमदार करुणाकर रेड्डी यांची वर्णी लागली. मात्र ते ख्रिश्चन धर्म पाळतात म्हणून तेलगू देसम पार्टी (टीडीपी)व भाजपसह विरोधी पक्ष या नेमणुकीला विरोध करीत आहेत. परंतु हेच करूणाकर रेड्डी 2006 ते 2008 याच तिरूमल ट्रस्टचे अध्यक्ष होते आणि तेव्हाही ख्रिश्चन धर्म पाळत होते. त्यावेळी विरोध न करणारे भाजप व इतर पक्ष आता केवळ राजकीय हेतूने विरोध करीत आहेत, असे काँग्रेसचे म्हणणे आहे.
तिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष वाय. व्ही. सुब्बा रेड्डी यांचा कार्यकाळ 8 ऑगस्ट रोजी संपला. त्यांच्या जागी आलेले करुणाकर रेड्डी यांनी 10 ऑगस्ट रोजी बोर्डाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. मात्र या नियुक्तीला विरोध करत तेलगू देसमचे राज्य सचिव बुची राम प्रसाद यांनी असा थेट सवाल केला आहे की, हिंदू धर्मावर विश्वास नसलेल्या व्यक्तीला मंदिराचा अध्यक्ष कसा बनवता येईल? रेड्डी ख्रिश्चन धर्म पालन करतात. त्यांचे ख्रिश्चन लोकांशी संबंध आहेत. त्यांच्या मुलीचे लग्न ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार झाले, हे सगळ्यांना ठाऊक आहे. भाजपच्या आंध्र प्रदेशच्या प्रदेशाध्यक्ष डी. पुरंदेश्वरी यांनीही या पदावर हिंदू धर्म मानणार्यांनीच बसावे. सरकार या पदाचा वापर राजकीय फायद्यासाठी करत असल्याचे या निर्णयावरून सिद्ध होते, असे म्हटले आहे.
भाजप नेते आणि माजी मुख्य सचिव आय. वाय. आर. कृष्ण राव हे तिरुपती बोर्डाचे माजी कार्यकारी अधिकारी आहेत. त्यांनीही सरकारच्या निर्णयावर टीका केली. ते म्हणाले की, तिरुपती तिरुमाला देवस्थानम विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदाची राजकीय नियुक्ती होणे हे दुर्दैवी आहे. वायआरएस काँग्रेसने सरकारचा हा निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे. पक्षाचे आमदार श्रीकांत रेड्डी म्हणाले की, करुणाकर रेड्डी यांच्या धार्मिक श्रद्धांबाबत कोणताही वाद नाही. विरोधी पक्ष विनाकारण मुद्दे काढत आहेत. तिरुपतीच्या लोकांना रेड्डी आणि त्यांच्या धर्माबद्दल सर्व काही माहीत आहे.
तिरुपती मंदिराचे अध्यक्षपद भूषवण्याची रेड्डी यांची ही दुसरी वेळ आहे. मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांचे वडील वाय. एस. राजशेखर रेड्डी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री असताना करुणाकर रेड्डी 2006-2008 या काळात ट्रस्टचे अध्यक्ष होते. त्यांनी श्री वेंकटेश्वर विश्वविद्यालयातून मास्टर डिग्री मिळवली आहे. रेड्डी हे वायएसआर कुटुंबाचे कट्टर समर्थक आहेत. यापूर्वी ते जगन मोहन रेड्डी यांच्यासोबत काँग्रेसमध्येही होते. वडिलांच्या मृत्यूनंतर जगन मोहन यांनी काँग्रेस सोडून वायएसआर काँग्रेसची स्थापना केली, तेव्हा रेड्डीही त्यांच्याबरोबर गेले. करुणाकर म्हणतात की, त्यांचे कुटुंब ख्रिश्चन धर्माचे पालन करते. परंतु ते स्वतः हिंदू धर्माचे पालन करतात.