(मुंबई)
हिंदी भाषेतील सुप्रसिद्ध मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ यामधील प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणारे मराठमोळे अभिनेते सुनिल होळकर यांचं दीर्घ आजारानं निधन झालं आहे. त्यामुळं संपूर्ण मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली असून त्यांच्या निधनामुळं कलाकारांनी शोक व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली आहे. नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये गेली अनेक वर्ष अभिनयामुळं सुनिल होळकर यांनी चाहत्यांवर एक वेगळीच छाप पाडली होती. त्यामुळं आता त्यांच्या अचानक निधनामुळं अनेक चाहत्यांना धक्का बसला आहे. सुनिल होळकर यांना लिव्हर सोरायसिस हा आजार झाल्यामुळं त्यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते.
लिव्हर सोरायसिसमुळं कोणत्याही क्षणी शरीरावर परिणाम होण्याची शक्यता असल्यानं डॉक्टरांची स्पेशल टीम त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होती. त्यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत असतानाच अचानक दोन दिवसापासून त्यांची तब्येत बिघडली होती. त्यानंतर काल दुपारी त्यांनी वयाच्या ४० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे.
सुनिल होळकर यांनी ‘गोष्ट एका पैठणीची’, ‘मोरया’ या चित्रपटात जबरदस्त अभिनय केला होता, तर मॅडम सर, मिस्टर योगी या मालिकेतून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. सुनिल यांनी अशोक हांडे यांच्या चौरंग नाट्य संस्थेत गेली अनेक वर्षे काम केलेलं आहे.