(मुंबई)
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ हा शो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शोमध्ये ‘रोशन सिंह सोढ़ी’च्या पत्नीची भूमिका साकारणाऱ्या जेनिफर मिस्त्री बन्सीवालने मालिकेचे निर्माते असित मोदी यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. असित कुमार मोदी व्यतिरिक्त प्रोजेक्ट हेड सोहल रमानी आणि एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर जतिन बजाजच्या विरोधात लैंगिक शोषणाचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे.
या आरोपाबाबत बोलताना ती म्हणाली की, १५ वर्ष काम करूनही हाफ डेचे पैसे कापले जायचे, आधी सांगूनही हाफ डे मिळायचा नाही. प्रेग्नन्सी दरम्यान जबरदस्तीने काढून टाकले गेले. लैंगिंक आणि मानसिक शोषण केले गेले. मी आता हीमालिका सोडली आहे. माझा अखेरचा भाग ६ मार्च रोजी प्रसारित झाला होता. प्रोजेक्ट हेड सोहेल रमानी आणि एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर जतिन बजाजने मला वारंवार अपमानित केले. तर या प्रकरणावर असित मोदी म्हणाले की, ‘ती माझी आणि शो दोघांची बदनामी करण्याचा प्रयत्न करत असल्याने आम्ही कायदेशीर कारवाई करू. आम्ही तिला काढून टाकल्याने ती असे निराधार आरोप करत आहे.’
ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत जेनिफर मिस्त्रीने सांगितले की तिने शो सोडला आहे. यासोबतच जेनिफर म्हणाली की, सोहिल रमाणी आणि जतीन बजाज यांच्याकडून माझा अपमान करण्यात आला, म्हणून मला त्यादिवशी सेट सोडावा लागला. त्या दिवशी ७ मार्च तारीख होती, होळी आणि माझ्या लग्नाचा वाढदिवस होता जेव्हा ही घटना घडली.’ अभिनेत्रीने तिच्या शूटिंगच्या शेवटच्या दिवसाबाबत बोलताना सांगितले की, ‘मला सोहिल यांनी चार वेळा सेटवरून जाण्यास सांगितले आणि कार्यकारी निर्मात्याने माझ्या कारमागे उभे राहून ती थांबवण्याचा प्रयत्न केला आणि मला सेट सोडू दिला नाही. मी त्यांना सांगितले की मी १५ वर्षे शोमध्ये काम केले आहे, ते मला जबरदस्तीने रोखू शकत नाहीत. मी निघत असताना सोहिलने मला धमकावले. मी असित कुमार मोदी, सोहिल रमाणी आणि जतीन बजाज यांच्याविरुद्ध लैंगिक छळाची तक्रार दाखल केली आहे.’
रोशन सिंग सोढीची भूमिका करणाऱ्या जेनिफर मिस्त्री हिने माध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘असित मोदी मला वारंवार कॉल करून खोलीत बोलवत होते. मी नकार दिल्यानंतर म्हणायचे की, मी तर गंमत करत होतो. मात्र ते नेहमी असे करू लागले. सर्वांसमोर माझ्या ओठांचे कौतुक करत मला वैयक्तिक मेसेज करायचे. या प्रकाराकडे मी सुरुवातील दुर्लक्ष केले. मात्र एकदा माझ्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी कॉल केला व म्हटले की, लग्नाचा वाढदिवस तर संपला आता तर खोलीत ये. दुसऱ्या दिवशी त्यांनी म्हटले की, तू खूप सुंदर दिसतेस. तुझे ओठ खूप सुंदर आहेत. वाटतं तुला पकडून किस करावं. मला त्यांच्या बोलण्याचे वाईट वाटत होते व मी रात्रभर रडत होते.
जेनिफरने सांगितले की, एकादा वैयक्तिक कारणांसाठी मी असितला कॉल केला होता. त्यांनी माझी अडचण ऐकल्यानंतर म्हटले की, जर तू माझ्या जवळ असतीस तर तुला मिठ्ठी मारली असती. त्यांनी ज्या पद्धीतने हे वाक्य बोलले ते खूपच घाणेरडे होते. अशा प्रकारच्या घटना अनेक वेळा झाल्या, मात्र मी त्याकडे लक्ष दिले नाही. त्यानंतर त्यांनी माझे फोन घेणे बंद केले. माझ्या सुट्ट्या रद्द करू लागले. माझे मानधन सर्वात कमी होते. मात्र शॉट असू दे किंवा नाही, सर्वाधिक काळ ते मलाच सेटवर थांबवून ठेवत होते. केवळ असित मोदी यांनीच नाही तर त्यांच्या टीममधील सुहेल आणि जतिन यांनीही मला त्रास दिला.
या मालिकेचे प्रोडक्शन हाऊस नीला टेलिफिल्मने याप्रकरणी एक निवेदनही जारी केले आहे. ज्यामध्ये असे नमूद करण्यात आले की, ‘तिच्यामध्ये सेटवर आवश्यक शिस्त नाही आणि कामावरदेखील तिचे लक्ष नसायचे. तिच्या वागण्याबाबत आम्ही प्रोडक्शन हेडकडे वारंवार तक्रार दिली आहे. तिच्या सेटवरील शेवटच्या दिवशीही तिने कारणाशिवाय सर्व युनिटसमोर शिवीगाळ केली आणि शूट पूर्ण न करता ती निघून गेली.