(संगमेश्वर / वार्ताहर)
तालुक्यातील ताम्हाणे पंचक्रोशी परिसरात गवारेड्यांनी धुमाकूळ घातला असून या भागात शेतीच्या होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरी धास्तावले आहेत.
गेले काही महिने गवेरेडे भातशेती, भाज्यांच्या मळ्यात जाऊन नुकसान करत आहे. आंबा, काजुचा हंगाम सुरू होण्यापूर्वी गवारेड्यांचा त्रास शेतकरी वर्गाला होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. गव्यांचा कळप सध्या दिसत असल्याने लोकांमधे घबराट पसरली आहे. या भागातील महिला, विद्यार्थी यांना दिवसा ढवळ्या गव्यांचे दर्शन होत आहे. ताम्हाणे पंचक्रोशी परिसरात गवारेड्यांचा वावर असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जिल्ह्यात यापूर्वी देखील गव्यांच्या हल्ल्यात शेतकरी मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्याने आणखी शेतकरी वर्गात भीती निर्माण होत आहे.
शेतीचे नुकसान केल्यानंतर वनविभागाकडे दाद मागायला गेल्यास पंच याद्या, सात बारा अशा फेऱ्या मारून शेतकरी हैराण होतात. आता या गव्यांपासून शेती कशी वाचवावी, या चिंतेत शेतकरी सापडला आहे. वानर बिबट्या आणि आता गवरेडे या जंगली प्राण्यांनी उच्छाद मांडला आहे. वनविभागाने त्वरित या गव्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी या भागातील ग्रामस्थांनी केली आहे.