(मुंबई)
खारघर इथं झालेल्या महाराष्ट्र भूषण सोहळ्या दरम्यान उष्माघातानं १४ जणांचा मृत्यू व शेकडो कोटी लोक बाधित झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका प्रशासन सतर्क झालं आहे. आरोग्य प्रशासनाने ‘उन्हाळ्यामध्ये काय काळजी घ्यावी’ याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
अशी घ्या काळजी
- तहान लागली नसली तरी पुरेसे पाणी प्या.
- हलके, हलक्या रंगाचे, सैल आणि सच्छिद्र सुती कपडे घाला.
- उन्हात बाहेर जाताना संरक्षक गॉगल, छत्री / टोपी, शूज किंवा चप्पल वापरा.
- प्रवासात पाणी व कांदा सोबत ठेवा.
- मद्यपान, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड शीतपेये (कोल्ड्रिंक्स) टाळा, यामुळं शरीराचं निर्जलीकरण होतं.
- उच्च प्रथिनेयुक्त अन्न टाळा आणि शिळे अन्न खाऊ नका.
- तुम्ही बाहेर काम करत असाल, तर टोपी किंवा छत्री वापरा. शक्य असल्यास मोठ्या सुती कापडानं डोके व चेहरा झाकून घ्या.
- तुमच्या डोक्यावर, मानेवर, चेहरा आणि हातपायांवर ओलसर कापडही वापरा.
- पार्क केलेल्या वाहनांमध्ये लहान मुले किंवा पाळीव प्राणी सोडू नका.
- तुम्हाला अशक्त किंवा आजारी वाटत असल्यास, ताबडतोब डॉक्टरांना भेटा.
- ओआरएस, लस्सी, तोराणी (तांदूळ पाणी), लिंबू पाणी, ताक, नारळपाणी इत्यादी घरगुती पेये नियमितपणे प्या. यामुळं शरीर पुन्हा ‘हायड्रेट’ होण्यास मदत होते.
- जनावरांना सावलीत ठेवा आणि त्यांना भरपूर पाणी द्या.
- तुमचे घर थंड ठेवा, पडदे, शटर किंवा सनशेड वापरा आणि रात्री खिडक्या उघडा ठेवा.
- बाधित व्यक्तीला थंड जागी, सावलीखाली ठेवा. या व्यक्तीला ओल्या कपड्याने पुसून काढा, वारंवार शरीर धुवा. डोक्यावर सामान्य तापमानाचं पाणी घाला. मुख्य गोष्ट म्हणजे त्याच्या शरीराचं तापमान कमी करा.
- बाधित व्यक्तीला ‘ओआरएस’ प्यायला द्या किंवा लिंबू सरबत / तोराणी किंवा जे काही शरीराला ‘रीहायड्रेट’ करण्यासाठी उपयुक्त आहे, असे पेय द्या.
- ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्रात घेऊन जा. उष्माघात जीवघेणा ठरू शकतो म्हणून रुग्णाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे, हे सदैव ध्यानात ठेवा.