(नवी दिल्ली)
तस्करी आणि बेकायदेशीर व्यापाराच्या सूत्रधारांवर कारवाई करण्यासाठी आंतरराज्य सहकार्य आवश्यक असून, ते करण्यात यावे, असे आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी सोमवारी केले. बेकायदेशीर व्यवसायामागील सूत्रधाराला पकडण्याकडे तपास यंत्रणांचे लक्ष केंद्रित असायला पाहिजे. नागरिकांना त्रस्त करणार्या आणि अर्थव्यवस्थेला अडचणीत आणणार्या या बेकायदेशीर कारवायांवर कठोर कारवाई आवश्यक आहे, असे सीतारामन् यांनी स्पष्ट केले.
तस्करी आणि वस्तूंच्या बेकायदेशीर व्यवसायाची पद्धत मागील 50 ते 60 वर्षांत बदललेली नाही आणि अद्याप मूल्यवान धातू, मादकपदार्थ आणि मूल्यवान वनउपज तसेत समुद्री जीवांची तस्करी सुरू आहे, असे सीतारामन् यांनी महसूल गुप्तचर संचालनालयाने आयोजित केलेल्या जागतिक परिषदेला संबोधित करताना सांगितले. तस्करी केल्या जाणार्या साहित्यात फारसा बदल झालेला नाही.
अबकारी अधिकारी गोंधळतील, असे कोणतेही नवीन क्षेत्र तयार झालेले नाही. मागील दशकांपासून हा कल कायम आहे. आता यामागे कोण आहे, याची माहिती आपण प्रामाणिकपणे द्यायला पाहिजे. वर्ल्ड कस्टम्स ऑर्गनायझेशनसोबत आंतरराज्य सहकार्य व्हावे यावर मी जोर देत आहे. या माध्यमातून स्थानिक प्रशासन आणि सरकारच्या मदतीने आपण तस्करीच्या मागील सूत्रधारांना पकडू शकू, असे सीतारामन् यांनी सांगितले. जप्त केलेला सर्व माल नष्ट केल्यास अवैध व्यवसायाला आळा बसेल. अशा प्रकारच्या तस्करीसाठी शिक्षा केली जाईल, असे सांगून नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण करू शकू, असे सीतारामन् म्हणाल्या.