(गुहागर)
गुहागर तालुक्यातील पर्यटन क्षेत्र असलेल्या तवसाळ बंदरात एलईडीने मच्छीमारी करण्यासाठी वापरण्यात येणारे जनरेटर रात्रीच्या वेळेस चढविण्यात येत आहेत. त्याचा स्थानिकांना फारच ततास होत आहे. अनेकदा स्थानिकांना दमदाटी करण्यात येत असल्याचे समजते.
तवसाळ हे एक पर्यटन क्षेत्र आहे. पर्यटकांना चढ-उतार करण्यासाठी येथे जेट्टी बांधण्यात आली आहे. या जेट्टीवरून तवसाळ ते जयगड फेरीबोट चालत असे. परंतु अरुंद रस्ता आणि हा रस्ता गावातून जात असल्याने स्थानिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन येथून सुटणारी फेरीबोट बंद करण्यात आली. फेरीबोटीसाठी दुसरी जेट्टी बांधण्यात आली. आता केवळ पर्यटकांना फिरण्यासाठी या जेट्टीचा वापर करण्यात येतो. तसेच वादळवाऱ्यात सुरक्षित बंदर म्हणून येथे डहाणूपासून रत्नागिरी पर्यंतच्या बोटी येऊन थांबतात. वादळ ओसरल्यावर निघून जातात. मात्र अडीअडचणीच्या काळात थांबणाऱ्या बोटमालकांनी हे बंदर हेरले असून, आता ते या बंदराचा नियमित वापर करू लागले आहेत. या बोटीतून मच्छीमारिसाठी आवश्यक सामानाची अवजड वाहनातून वाहतूक होत असल्याने जेट्टीची वाताहत झाली आहे. त्याचा पर्यटकाना त्रास होत आहे.
जिल्ह्यात एलईडीने मच्छीमारी करण्यास बंदी असतानाही आता रात्री-अपरात्री एलईडीने मच्छीमारीसाठी लागणारे जनरेटर चढविण्यात येतात. सिंगल वाहन जाऊ शकणाऱ्या रस्त्यातून जनरेटर चढविण्यासाठी आवश्यक असलेले हायड्रा (क्रेन) आणण्यात येतात. त्यावेळी होणारा माणसांचा गोंगाट, गाड्यांचा खडखडाट यामुळे स्थानिक त्रस्त आहेत. हे लोक गँगने येत असल्याने स्थानिक भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. विशेष म्हणजे यात स्थानिक मच्छीमारांच्या बोटी नाहीत. तवसाळ व्यतिरिक्त इतर गावांच्या या बोटी असतात. जिल्हाधिकाऱ्यांनी याची वेळीच दक्षता घ्यावी, अशी ग्रामस्थांची विनंती वजा मागणी आहे. अन्यथा भविष्यात गंभीर प्रसंग ओढवण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे.