(जयपूर)
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे सोमवारी राजस्थानच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पूर्व राजस्थानमध्ये कालवा प्रकल्पासाठी जनजागृती मोहीम सुरू केली आणि तसेच एका जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, राजस्थानमध्ये काँग्रेसने आपले सरकार वाचवले तर २०२४ मध्ये काँग्रेस केंद्रात सत्तेवर येईल, असा दावा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला आहे. तसेच लाल डायरीवरून सध्या राजस्थानचे वातावरण चांगलेच तापत आहे. गहलोत सरकारवर यावरून भ्रस्टाचाराचे आरोप केले जात आहेत. मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधानांनी केलेल्या आरोपावरही भाष्य केले आहे.
मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, लाल डायरीवरून पंतप्रधान अशोक गेहलोत सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करतात. या लाल डायरीत असे लिहिले आहे की, पुढील विधानसभा निवडणुकीनंतर राजस्थानमध्ये काँग्रेस पुन्हा सरकार स्थापन करेल. ‘राजस्थानमध्ये काँग्रेस आपले सरकार वाचवण्यात यशस्वी ठरली तर २०२४ मध्ये काँग्रेस केंद्रात सत्तेवर येईल,’ असा दावा त्यांनी केला आहे. तसेच ते म्हणाले की, २०१९ मध्ये राजस्थानच्या जनतेने भाजपचे २५ खासदार निवडून दिले होते. पण तो लोकांसाठी ना निधी आणू शकले ना ही पाणी. राजस्थान विधानसभेची निवडणूक २५ नोव्हेंबरला एकाच टप्प्यात होणार असून ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.