(राजापूर)
राजापूर मैत्री प्रतिष्ठान,ठाणे या सामाजिक संस्थेच्या वतीने निर्मल भिडे जनता विद्यालय व इंद्रनील तावडे कला व वाणिज्य महाविद्यालय, कोंडये येथे व्यवसाय मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून समुपदेशक मिलिंद कडवईकर यांचे मार्गदर्शन लाभले.
मार्गदर्शन करताना मिलिंद कडवईकर यांनी करीयर निवडीचे टप्पे,करीयर निवडताना घ्यावयाची काळजी,विविध सीईटी परीक्षा, त्याद्वारे करीयरच्या संधी,स्पर्धा परीक्षांना सामोरे जाताना करावयाची तयारी व विविध करीयरचे मार्ग यावर सखोल मार्गदर्शन केले.ते म्हणाले की,विद्यार्थी दशेतच ध्येयनिश्चिती केली तर अल्पावधीतच यशस्वी होता येते.हे समजावताना त्यांनी यशस्वी महापुरुष व वैज्ञानिक यांची उदाहरणे,मोटिव्हेशन व्हिडिओ व पॉवरपॉइंट यांचा वापर केला.ते पुढे म्हणाले की,कोकणात नोकरीच्या संधी मोठ्या प्रमाणात असून कोकणातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षांकडे दुर्लक्ष करताना दिसतात.कोकणात पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात त्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी हॉटेल व पर्यटन विषयात करीयर करायचे ठरवले तर शहराकडे होणारे स्थलांतर काही प्रमाणत थांबू शकेल.
मैत्री प्रतिष्ठानची स्थापना कोंडये हायस्कूलच्या 2008 सालच्या इयत्ता दहावीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन केलेली आहे.आपण गावात शिकून यशस्वी झालो आता गावातील विद्यार्थ्यांनी असेच यशस्वी व्हावे यासाठी ही संस्था 2018 सालापासून काम करीत असल्याचे संस्थेचे अध्यक्ष दीपक चौकेकर यांनी सांगितले.संस्थेच्या वतीने दहावीच्या विद्यार्थ्यांना 21 अपेक्षितचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी निवृत्त शिक्षणाधिकारी पिराजी पाटील उपस्थित होते त्यांनी कोकणातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमात जिल्हास्तरावर यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे मैत्री प्रतिष्ठानच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन अभिनंदन करण्यात आले.यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक अरुण कुराडे,अर्जुन चौगुले,अशोक महाडेश्वर व शिक्षकवृंद उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मैत्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक चौकेकर, खजिनदार निलेश कुवळेकर, सदस्य सुधीर चौगुले, अनिकेत डोंगळे, अनिकेत कोंडविलकर यांनी मेहनत घेतली.