( रत्नागिरी / प्रतिनिधी )
पालिकेवर कोविड काळातील पाणीपट्टी वसुलीचा दोन कोटींचा बोजा कायम आहे. त्यात या आर्थिक वर्षातील पाणीपट्टी दोन कोटी असे चार कोटी वसुलीचे मोठे उद्दिष्ट पालिकेच्या पाणी विभागासमोर आहे; परंतु पाणी विभागाने चांगली कामगिरी करीत ५० टक्के वसुली केली आहे. या महिन्याच्या १५ तारखेला थकबाकीदारांना नोटिसा बजावण्यात येणार आहेत. त्या मुदतीत पाणीपट्टी न भरल्यास नळजोडणी तोडण्याचा इशारा पालिकेने दिला आहे.
घरपट्टी, पाणीपट्टी पालिकेच्या आर्थिक उत्पन्नाचे मुख्य साधन आहे. हे कर शंभर टक्के वसूल झाल्यास पालिकेला मोठा आर्थिक हात मिळतो; परंतु कोरोना काळानंतर पालिकेच्या या करांच्या वसुलीवरही मोठा परिणाम झाला.
पाणीपट्टी वसुलीचे दोन कोटींचे उद्दिष्ट पालिकेला दरवर्षी असते; मात्र कोरोना काळात दोन कोटी पाणीपट्टी अद्याप थकित असल्याने पालिकेवर त्याचा बोजा पडला आहे.